गावात भीतीचे वातावरण : 2 लाख 57 हजार किमतीचे दागिने लांबविले
वार्ताहर /काकती
होळी गल्ली, काकती येथील रहिवासी हिंडाल्को कंपनीचे कर्मचारी अभिषेक मारुती नार्वेकर यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या 2 लाख 57 हजार किमतीच्या दागिन्यांसह 80 हजार रुपये रोकड घेऊन पलायन केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. तसेच इतर दोन घरांचे कुलूप तोडल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. भरवस्तीत चोरट्यांनी मोठे धाडस केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस व नार्वेकर कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार नार्वेकर कुटुंबीय सोमवारी रात्री जेवण उरकून घराच्या खालच्या मजल्याला कुलूप लावून झोपी गेले होते. पहाटे अभिषेकची आई दरवाजा काढायला गेली. मात्र दरवाजा उघडत नव्हता. बाहेरून कडी लावण्यात आल्याचे समजले.
खिडकीतून शेजारी जागे झाल्याचे दिसले. त्यांनी खालच्या मजल्याचे दरवाजे उघडे असल्याचे सांगून बाहेरील कडी काढली. चोरट्यांनी तिजोरी फोडून सर्व काही अस्ताव्यस्त केले होते. काकती पोलिसांना बोलावून सारा प्रकार दाखविला. 40 ग्रॅम सोन्याचे तोडे, 35 ग्रॅम सोन्याचा श्रीमंत हार, 5 ग्रॅमची अंगठी, 5 ग्रॅम आदी सोन्याच्या ऐवजासह 180 ग्रॅम श्रीलक्ष्मी मूर्ती, 60 ग्रॅम बाळाला दिलेल्या भेटवस्तू आदी चांदीच्या ऐवजासह रोकड 80 हजार रुपये तसेच इतर वस्तू मिळून 3 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. पोलिसांनी लागलीच ठसे तज्ञ व श्वानपथक मागवून तपास केला. श्वानपथक नार्वेकर यांच्या घरातून जाऊन सरळ होळी गल्लीकडे खाली गेले. प्रकाश कोळीच्या आई लक्ष्मी यांच्या घराचा कडी-कुलूपही तोडण्यात आला होता.
चोरट्यांचा उच्छाद : इतर दोन घरांत चोरी
चोरट्यांनी उच्छाद मांडला असून प्रत्यक्षात काही चोरीच्या घटनांची पोलीस स्थानकात नोंद केली नाही. यापैकी प्रकाश कोळीची आई लक्ष्मी या कुलूप लावून गावी गेल्या होत्या तर कोटार नगरातील दुसऱ्या घटनेत अनुसया शंकर अट्टेकर या लेकीला भेटायला कोल्हापूरला गेल्या होत्या. या दोघांच्या घरांचेही कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. त्यांचेही काही रकमेसह ऐवज चोरीला गेला आहे. पण त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. एका मध्यरात्रीत चोरट्यांनी बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.









