कागल / प्रतिनिधी
कागल शहरातील भरवस्तीत असणाऱ्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी 12 लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा 13 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी बाबासाहेब अहमद काजी यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, कागल शहरातील मुजावर गल्लीत चिकन व्यापारी बाबासाहेब काजी यांचा बंगला आहे. दोन दिवसांपासून हा बंगला बंद होता. त्यामुळे रविवारी मुजावर गल्लीतील घराला कुलूप होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून आतील 12 लाख रुपये रोख, 1 लाख रुपयांचे दीड तोळे सोने व 80 हजार रुपये किंमतीची 1 किलो चांदी असा एकूण 13 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. यावेळी चोरट्यांनी कपाटातील सर्व साहित्य विस्कटून टाकले होते. हाज यात्रेसाठी ही रक्कम जमा केली होती, असे काजी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सहकाऱ्यांसह पाहणी करून पंचनामा केला. तसेच ठसे तज्ञांना पाचारण केले होते. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार अधिक तपास करत आहेत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराजवळच ही चोरीची घटना घडली आहे. तसेच कागल पोलीस ठाणेही येथून थोड्याच अंतरावर असताना ही घरफोडी झाली आहे. कागल परिसरात वर्षभरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









