पाठीमागील दरवाजा फोडून 6 तोळे सोने लंपास
बेळगाव : जनता प्लॉट, पिरनवाडी येथील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून तिजोरीतील सहा तोळे सोने पळविण्यात आले आहे. शनिवार दि. 17 जून रोजी ही घटना घडली असून सोमवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुनील शिवाजी पाटील यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. शनिवारी सुनील हे नेहमीप्रमाणे उद्यमबागला कामाला गेले. त्यानंतर त्यांची पत्नी व मुलगा आपल्या घराला कुलूप लावून बाजारात गेले होते. त्याच दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुलगा घरी परतला, त्यावेळी पाठीमागचा दरवाजा उघडा होता. बाजाराच्या जाण्याच्या गडबडीत आम्हीच कडी लावली नसणार या समजुतीने ते गप्प झाले. रविवारी दुपारी चांदीचे एक पैंजण घराबाहेर पडले होते. तिजोरीत ठेवलेले पैंजण घराबाहेर कसे? या विचाराने तिजोरीत पाहिले असता सहा तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनाईक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









