सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेआठ लाखांचा ऐवज लांबविला, घरफोड्यांचे सत्र सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गणपत गल्लीसारख्या नेहमीच गजबजलेल्या मध्यवर्ती बाजारपेठेतील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीच्या या घटनेने बाजारपेठेत एकच खळबळ माजली आहे.
मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश दामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. सोमवार दि. 15 जानेवारीच्या दुपारी 12 ते शनिवारी 20 जानेवारीच्या सकाळी 9.45 या वेळेत ही घटना घडली आहे.
गणपत गल्ली (गणेश मंदिरासमोर) येथील लक्ष्मी विजय सिद्दण्णावर यांनी फिर्याद दिली आहे. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 102 ग्रॅम सोन्याचे दागिने, 420 ग्रॅम चांदी व 3 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 8 लाख 38 हजार 900 रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. चोरट्यांनी 50 ग्रॅम वजनाचे दोन जुने तोडे, 50 ग्रॅम वजनाचा श्रीमंतहार, कर्णफुले व चांदीचे साहित्य पळविले आहे.
लक्ष्मी यांचे पती विजय व त्यांचे इतर नातेवाईक देवदर्शनासाठी शबरीमलयला गेले आहेत. लक्ष्मी 15 जानेवारी रोजी संक्रांतीनिमित्त वडगाव येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्यांची भावजय पवित्रा याही कित्तूर तालुक्यातील तिगडोळी येथे गेल्या होत्या. घराला कुलूप लावून हे कुटुंबीय गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे. तिजोरी व ट्रंकमध्ये ठेवलेले दागिने व रोकड पळविण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात उपनगरातील घरांना चोरट्यांनी लक्ष्य बनविले होते. आता मध्यवर्ती बाजारपेठेतही दुकाने व घरे फोडण्यात येत आहेत. गणपत गल्ली, कंबळी खूट परिसरात पोलीस दलाच्यावतीने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गेल्या चार-पाच दिवसात फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढावा लागणार आहे. मात्र, सध्या पोलीस यंत्रणा सुस्तावली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.









