दुसऱया घरातील चोरीचा प्रयत्न फसला
उचगाव /वार्ताहर
बेळगुंदी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर व सोनोली गावातील दुर्गादेवी मंदिरातील चोरीची घटना ताजी असतानाच बसूर्ते गावात चोरटय़ांनी घरफोडी करुन दोन लाखांचा ऐवज लांबविला. बसुर्ते-दत्त गल्लीमध्ये असलेल्या अनुसया वैजू डोंगरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला आणि तिजोरी, ट्रंक फोडून रोख रक्कम 5000 रुपये तसेच दोन तोळय़ाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने लंपास केले. दुसऱया एका घरात चोरी करण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न होता. मात्र घरातील लोक वेळीच जागे झाल्यामुळे चोरटय़ांनी तेथून पोबारा केला. या चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनुसया वैजू डोंगरे या सोमवारी कामानिमित्त दुसऱया गावी वस्तीलाच गेल्या होत्या. त्यामुळे घरी रात्री कोणच नसल्याने घराला कुलूप लावण्यात आले होते. सदर घराचे कुलूप तोडत असताना गल्लीतील बाजूच्या घरातील लोक बाहेर पडू नये यासाठी चोरटय़ांनी शेजारच्या घरांचे समोरील व मागील बाजूला असलेले कडीकोंयडे लावून घेतले आणि अनुसया डोंगरे यांच्या घरात चोरी केली. मंगळवारी पहाटे डोंगरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती शेजारील परसामध्ये असलेल्या जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले असता दरवाजे उघडे असून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याची माहिती अनुसया डोंगरे यांना कळवून त्यांना बोलावून घेण्यात आले.
दरम्यान एक घरफाडी केल्यानंतर प्राथमिक मराठी शाळेच्या मागील बाजूला असलेल्या श्रीकांत गायकवाड यांच्या घराच्या कडीकोयंडे चोरटय़ांनी तोडले. मात्र घरातील झोपलेल्या व्यक्तींना जाग आल्यानंतर घरातील लाईट लावण्यात आले. लाईट लागताच, चोरटे पळून गेले आणि गायकवाड यांच्या घरातील चोरीचा प्रकार टळला.
बसूर्ते गावचे ग्रामपंचायत सदस्य सुरज सुतार आणि दत्ता बेनके यांनी या डोंगरे व गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन, चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी केली. काकती पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली. काकती पोलीस स्टेशनचे पीएसआयनी येऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
बसूर्ते गावामध्ये चोरीचा प्रकार झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून, लोक भयभीत झाले आहेत. तरी पोलीस खात्याने तातडीने याचा तपास लावून या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ही गावातील नागरिकांनी केली आहे.









