बंद घराचा कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास : परिसरात भीतीचे वातावरण
बेळगाव : बंद घराचा कुलुप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 5 लाखाहून अधिक किमतीच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. मंगळवारी सकाळी अवचारहट्टी (येळ्ळूर, ता. बेळगाव) येथे ही घटना उघडकीस आली असून घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. परशराम हुवाप्पा तुळजाई (रा. मारुती गल्ली, अवचारहट्टी) यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. तुळजाई कुटुंबीय सोमवारी आपल्या घराला कुलुप लावून हंगरगा येथील यात्रेनिमित्त पाहुण्यांकडे गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घरच्या दर्शनी दरवाजाचा कुलुप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर कपाट फोडून त्यामध्ये ठेवण्यात आलेले दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, सव्वा तोळ्याचा नेकलेस, अर्ध्या तोळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याच्या कानातील रिंग्स, कर्णफुले तसेच पाच तोळ्याचे चांदीचे दागिने आणि 25 हजाराच्या रोख रकमेवर डल्ला मारून पलायन केले. मंगळवारी सकाळी तुळजाई कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. काहींनी ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. या चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येळ्ळूर, धामणेसह परिसरातील गावांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. रात्रीची गस्त वाढविण्याबरोबरच चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली जात आहे.
बेंटेक्सचे दागिनेही पळविले
तुळजाई कुटुंबियांनी घरातील कपाटात खऱ्या दागिन्यासोबत बेंटेक्सचे दागिनेही ठेवले होते. मात्र चोरट्यांनी खरे दागिने समजून बेंटेक्सच्या दागिन्यावरही डल्ला मारला आहे. त्याचबरोबर प्लबिंगच्या तीन मशीन आणि महागड्या साड्या पळविल्या आहेत. या घटनेमुळे तुळजाई कुटुंबियांचे लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले असल्याने पोलिसांनी या घटनेचा छडा लावावा, अशी मागणी केली जात आहे.









