चोरट्यांनी दर्शनी-मागील दरवाजा फोडला
बेळगाव :
टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर येथे घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून घरातील मंडळी झोपी गेलेली असताना दरवाजा फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासंबंधी नव्यराज शेट्टी यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घरी नव्यराज यांचे आईवडील दोघेच होते. ते गावाहून परतले होते. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांना काहीतरी आवाज आला. घरासमोरून ट्रक जात असणार म्हणून हे दाम्पत्य झोपी गेले. दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता झोपेतून उठलेल्या दाम्पत्याला धक्का बसला. कोणीतरी दर्शनी दरवाजा व पाठीमागचा दरवाजा फोडल्याचे दिसून आले. स्वयंपाक घराची कडी काढण्याचाही प्रयत्न झाला आहे. यासंबंधी शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उस्मान आवटी पुढील तपास करीत आहेत.









