15 तोळे सोने, 40 तोळे चांदी लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील सन्नहोसूर येथे दोन घरात दिवसाढवळ्या चोरी करून चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि 40 तोळे चांदीचे दागिने तसेच रोख 17 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव येथून श्वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानपथक तेथेच घुटमळत राहिले. ठसेतज्ञांनी ठशांचे नमुने घेतले असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. खानापूर तालुक्यात पुन्हा चोरटे सक्रिय झाले असल्याने ग्रामस्थांतुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी पोलिसासमोर आव्हान उभे केले असून गेल्या दोनवर्षात झालेल्या चोऱ्यातील एकाही चोरीचा तपास खानापूर पोलिसाकडून लावण्यात आलेला नाही. मात्र चोरट्यांनी आपले कारनामे सुरुच आहेत. सध्या भात कापणीचा हंगाम जोरात सुरू असल्याने ग्रामीण भागात सर्व लोक भात कापणी आणि ऊस तोडणीसाठी शेतावर जात आहेत. याच संधीचा लाभ उठवत ग्रामीण भागात चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत.
सन्नहोसूर येथील शेतकरी गंगाराम पाखरे आणि संभाजी पाटील हे भात कापणीचा हंगाम सुरू असल्याने भात कापणीसाठी सकाळीच शेतावर गेले होते.घरात कोणी नसलेले पाहून चोरट्यांनी दोन्ही घराचे मागील बाजूचे दरवाजे तोडून घरात प्रवेश करून मुख्य दरवाजाला आतून कडी लावली. घरातील तिजोरी, ट्रंक तोडून शोधाशोध केली. त्यावेळी संभाजी पाटील यांच्या घरातील 10 तोळे सोन्याचे दागिन्यासह 250 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गंगाराम पाखरे यांच्या घरातील 5 तोळे सोन्याचे दागिने तसेच 15 तोळ्याचे चांदीचे दागिने आणि रोख 17 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले आहेत. संभाजी पाटील यांची विवाहित मुलगी भात कापणीच्या मदतीसाठी आपल्या माहेरी सन्नहोसूर येथे आली होती. तिने आपले दागिने घरात ठेवून भात कापणीसाठी शेतावर गेली होती. ही सर्व मंडळी सायंकाळी शेतावरुन परत आल्यावर घराचा मागील दरवाजा उघडा असलेला पाहून घरात प्रवेश केला असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर खानापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. खानापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. गिरीश, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यानंतर बेळगाव येथून ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले असून खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ब्लँकेट विकणाऱ्यांवर संशय व्यक्त
सन्नहोसूर गावात मंगळवारी सकाळी दोघेजण ब्लँकेट विकण्यासाठी फिरत होते. घरोघरी जावून ब्लँकेट विकण्यासाठी गळ घालत होते. हे ब्लँकेट विक्रेते दुपारी दोन वाजेपर्यंत गावातच घुटमळत होते. दुपारी 2.30 नंतर हे ब्लँकेट विक्रेते गावातून गेल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ब्लँकेट विक्रेत्यांवर दाट संशय व्यक्त होत आहे.









