रोख रक्कम, सोने लंपास : तालुक्यात भीतीचे वातावरण
खानापूर : खानापूर तालुक्यातील बरगाव, सन्नहोसूर, निडगल, गर्लगुंजी, शेडेगाळी अशा पाच गावात एकाच रात्रीत घरफोड्या करून रोख रक्कम आणि सोने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलीस खातेही चक्रावून गेले आहे. याबाबत श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करून पोलिसांनी तपासणी केली आहे. तालुक्यातील बरगाव येथील रामचंद्र शिवाजी पाटील, माऊती मुदगेकर, माऊती सुतार, अजित देसाई यांची चार बंद घरे फोडून चोरट्यांनी सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. अजित देसाई यांच्या घरातील साडेचार तोळे सोने व रोख वीस हजार ऊपये चोरट्यांनी लंपास केले. तर निडगल, सन्नहोसूर येथील बंद घरे लक्ष्य केली आहेत. मात्र या घरांतून कोणताही ऐवज अथवा रोख रक्कम गेली नाही.
तसेच गर्लगुंजी येथील जय जिजाऊ या सहकारी पतसंस्थेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीतील साडेचार हजार ऊपये लंपास केले आहेत. तर शेडेगाळी येथीलही बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. शेडेगाळी येथील परशराम गेनाप्पा कुमृतवाडकर, नामदेव कुमृतवाडकर, माऊती परशुराम गुरव, विष्णू भरमानी मयेकर यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली आहे. यातील नामदेव कुमृतवाडकर हे पुण्याला गेले आहेत. वीट उत्पादन करण्यासाठी शेतात राहात आहेत. ही चार घरे रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली आहे. मात्र शेतातून घराकडे कुणीतरी आले असेल असे गृहीत धरून दिवसभर कोणीही याकडे लक्ष दिले नाही. मात्र सायंकाळी घरे उघडीच राहिल्याने याबाबत चर्चा झाली. हे सर्वजण शेताकडे असल्याने त्यांना बोलावून घेण्यात आले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. बरगाव येथील अजित देसाई यांच्या घरातील साडेचार तोळे सोने आणि रोख वीस हजार ऊपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. मात्र सुदैवाने अजित देसाई यांच्या घरातील आणखी पाच तोळे सोने चोरट्यांच्या हाती लागले नसल्याने ते पोलीस तपासणी करताना तिजोरीच्या खाली पडलेले निदर्शनास आले आहे. एकाच रात्री इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या होण्याची तालुक्यात पहिलीच वेळ असून चोरट्याने नियोजन करून घरफोडी केल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी डॉग स्कॉड आणि ठसे तज्ञांना पाचारण करून तपासणी करण्याचा प्रयत्न केला आहे. ठसे तज्ञांनी घशाचे नमुने घेतलेले आहेत. याबाबत खानापूर पोलीस स्थानकात बरगाव येथील घरफोडी आणि गर्लगुंजी येथील चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.









