पार्वतीनगरमध्ये साडेपाच लाखांची चोरी
प्रतिनिधी/ बेळगाव
एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून साडेपाच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. मंजुनाथ कॉलनी, पार्वतीनगर परिसरात शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शंकर नारायण गवाळकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. 9 जून रोजी शंकर व त्यांचे कुटुंबीय मालवणला गेले होते. सायंकाळी त्यांच्या मुलाच्या मित्राने पाहिले असता घरात कोणी नसताना दरवाजा मात्र उघडा होता. ही गोष्ट त्याने शंकर यांना कळविली.
शनिवारी सकाळी ते मालवणहून बेळगावात दाखल झाले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता चोरट्यांनी 127 ग्रॅम सोन्याचे दागिने, 10 ग्रॅम चांदी, 45 हजार रुपये रोख रक्कम पळविली आहे. कडीकोयंडा तोडून गुन्हेगारांनी घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनाईक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. शनिवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिरनवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून दीड लाखाचा ऐवज पळविल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी पार्वतीनगर परिसरात चोरी झाली आहे. हिंडलगा-सुळगा परिसरात विहिरीवरील पंप, केबल पळविण्याचे प्रकार सुरू आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गुन्हे वाढले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.