काँग्रेसला कोल्हापूरमध्ये लोकसभेसाठी उमेदवार मिळत नसून पी.एन. पाटील म्हणातात बंटी पाटलांनी लढावं, तर बंटी पाटील म्हणातात पी.एन. यांनी लढावं असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा काँग्रेसला लगावला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पाणी योजनेला मान्यता दिल्यानेच ती पुर्ण होऊ शकली आणि आपण पालकमंत्री असताना ती पुर्ण होत आहे हे माझं भाग्य समजतो. असेही मत त्यांनी व्यक्त केले. नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर महानगर पालिकेला भेट देऊन पालिकेतील विविध कामांचा आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेतला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महानगर पालिकेतील विविध विषयांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “महानगरपालिकेतील विविध विभागाच्या 21 विषयांच्या प्रश्नाचा आज मी आढावा घेतला आहे. कोल्हापूरकरांना पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यायला लागतंय. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन राबवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी योजनेला मान्यता दिली होती. आज घडीला ही योजना अंतिम टप्प्यात आलीय. विजयादशमीच्या दिवशी हे पाणी पुईखडीच्या ठिकाणी येईल. यावेळी नव्या पाण्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान करता येणार आहे. मी पालकमंत्री असताना हे पाणी कोल्हापूरकरांना मिळतंय हे माझं भाग्य समजतो.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्यांनी “घनकचऱ्यासाठी महानगर पालीकेला सरकारकडून जो निधी लागेल तो दिला जाणार आहे. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी जो निधी मंजूर आहे तो निधी लवकरच दिला जाणार आहे. कोल्हापूर शहरात 100 इलेक्ट्रीक व्हेईकल गाड्या आणणार आहे त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. इलेक्ट्रीक व्हेईकल गाड्या आल्याशिवाय केएमटी तोट्याच जायचं थांबणार नाही. परिख पुलाचे काम दुरुस्तीसाठी 3 कोटी 88 लाख दिले जाणार आहेत. नवरात्र उत्सवाच्या आधी सर्व रस्ते चकाचक केले जाईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभेवर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा काँग्रेसला डिवचले आहे. ते म्हणाले, “कोल्हापुरात लोकसभेला बंटी पाटील म्हणतात पी. एन. पाटील यांनी लढावं…..पी. एन. पाटील म्हणतात बंटी पाटील यांनी लढावं. आता त्यांच्याकडे तिसरा उमेदवार कोण आहे मला माहित नाही.” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापूरच्या हद्दवाढीवर बोलताना त्यांनी जिथं वाद नाही ती गावं आधी शहरात घेतली जाणार आहेत तसेच ज्या गावांचा विरोध आहे त्या गावांचा समावेश यात असणार नाही. त्यांनी उगाचच आंदोलन करून वेळ वाया घालवू नये. असेही स्पष्टिकरण दिले.
राज ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर बोलताना ते म्हणाले, “टोल द्यावा लागतो हे खरं असून साधन सामुग्री वाढल्याशिवाय विकास कामे कशी होतील. नितीन गडकरी यांनी याबाबत योग्य भूमिका सांगितली आहे. राज ठाकरे यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावी मुख्यमंत्री यावर योग्य तो खुलासा करतील.”
आदित्य ठाकरे यांच्या आरोग्य विभागाचा पंचनामा करावा या मागणीवर भाष्य करताना ते म्हणाले, “त्यांनी खुशाल पंचनामा करावा. आरोग्य यंत्रणा फार पूर्वीपासून कार्यरत असून माझ्या विभागाकडे 27 रुग्णालये आहेत. ती पुढच्या काळात एम्ससारखी करू.” असेही त्यांनी म्हटले आहे.









