माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची तातडीने घटनास्थळी धाव
कणकवली / प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या शहरातील सोनगेवाडी येथील बंगल्याला शॉर्ट सर्किटने आग लागून मोठे नुकसान झाले आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग विझवली. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.या आगीत बिल्डर उदय पवार यांच्या ऑफिसमधील सर्व महत्वाची कागदपत्रे फर्निचर जळून खाक झाले. घरातील टीव्ही ,एसी ,फर्निचर, पीओपी जळाले. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने त्यांच्या बंगल्यातील तळमजल्यावरील ऑफिसला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत हॉलमध्ये आली. उदय पवार व त्यांचे वडील लवू पवार हे पहिल्या मजल्यावर बेडरूम मध्ये झोपले होते. आगीमुळे तळमजल्यावरील जळत असलेल्या फर्निचर व अन्य साहित्याच्या आवाजामुळे व धुरामुळे त्यांना जाग आली. तसेच बंगल्यालगतच्या पवार बिल्डिंगमधील नागरिकांनाही आगीमुळे जाग आली. स्थानिक नागरिकांनी घरातील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. निखिल आचरेकर यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याना घटनेची कल्पना देताच नलावडे यांनी नगरपंचायतच्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लवू पवार व उदय पवार यांना शिडीच्या साहाय्याने खाली उतरविण्यात आले. आग विझविण्यासाठी संजय पाटकर, बाळा पराष्टेकर, निखिल आचरेकर, अमोल परराष्टेकर अजित पारधीये, कुबल सर व स्थानिक आणि मेहनत घेतली.









