सुधाकर काशीद,कोल्हापूर
भीक मागून जगण्याची वेळ कोणावरही येऊ नये. अशी वेळ येऊन एकही उपाशी राहू नये असेही शासनाचे धोरण आहे. तरीही आपल्या आजूबाजूला भीक मागणारे दिसतातच. धार्मिक स्थळांच्या परिसरात तर भीक मागणाऱ्यांची झुंड दिसते. कुठल्या मंदिराच्या दारात कधी भीक मागायला बसायचे याचे तर अलिखित वेळापत्रक ठरले आहे. काही जणांची परिस्थिती अशी की, जगण्यासाठी भीक मागणे हाच एक त्यांच्या समोरचा पर्याय आहे. तर काही जणांनी मात्र भीक मागणे हा कमाईचा वेगळा मार्ग म्हणूनही स्वीकारला आहे. भीक मागणाऱ्यांचे हे जग एका बाजूला काळजाला हात घालणारे आहे. आणि दुसऱ्या बाजूला कमाई म्हणून भीक मागणार यांच्या विचित्रपणाचे दर्शन घडवणारेही आहे. याचा हा या मालिकेद्वारे आँखो देखा हाल…
एसटी स्टँड समोरच्या वटेश्वर महादेव मंदिरासमोर सोमवारी सकाळी सात साडेसातलाच भाविकांची वर्दळ सुरु होते. आणि त्याचवेळी मंदिराच्या दुतर्फा भिकेची याचना करत बसणाऱ्यांची रांगच बसू लागते. जणू काही ठरवून दिलेल्या जागेप्रमाणे हे भिकारी आपापल्या जागा धरतात. पाच-पाच, सहा जणांचे गट तयार करतात. या पाच सहा जणांपैकी कोणालाही रुपया दोन रुपया पाच रुपयांची भीक मिळू दे.आपसात वाटून घ्यायचे ठरवून दिवसभर बसतात. सायंकाळी प्रत्येकाच्या भांड्यांतील चिल्लर एकत्र करतात आणि दिवसभराच्या त्या कमाईचा हिशोब पूर्ण करतात.
सोमवारी वटेश्वर मंदिर, मंगळवारी यल्लमाचे मंदिर, गुरुवारी आझाद चौकातील दत्त मंदिर, शुक्रवारी अंबाबाई मंदिर, शनिवारी शनि मारुतीचे मंदिर आणि रविवारी घाटी दरवाजा जवळ जोतिबा मंदिराजवळ हे भिकारी गटागटांनी बसलेले असतात.या भीक मागण्यामागे गरिबी हे तर कारण आहेच.पण गरीब म्हणून भीक मागणारे वेगळे आणि कमाई म्हणून भीक मागणारे वेगळे असे दोन प्रवाह तयार झाले आहेत. त्यातूनच भीक मागणाऱ्यांबद्दल, त्यांच्यातल्या काही जणांच्या अरेरावी बद्दल उलट सुलट चर्चा आहे. आणि मदतीसाठी याचना करणारा खरोखर भिकारी कोण? आणि कमाईचा मार्ग म्हणून भीक मागणारा कोण?यातला फरक कळणेही आता कठीण झाले आहे.
मंदिरासमोर भीक मागत बसणाऱ्यांची कोल्हापुरातील भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे.विशेषतः कोल्हापुरात गुरुवारी भिकाऱ्यांची झुंड फिरतानाचे चित्र वर्षानुवर्ष पहायला मिळत आहे.याच्यामागे एक धार्मिक कारण दडले आहे.श्री दत्ताचे कोल्हापुरात असंख्य भाविक आहेत.आणि श्री दत्ता बद्दलची कोल्हापुरातली अख्यायिका अशी की,दर गुरुवारी श्री दत्त भिक्षा मागण्यासाठी कोणत्याही रूपात कोल्हापुरात येतात.आणि या अख्यायिकेचा पगडा अजूनही एवढा की,इतर दिवसापेक्षा गुरुवारी लोकांचा दान धर्मासाठी हात खुला असतो.कोण जाणे,समोरचा याचना करणारा दत्त असेल या भावनेने लोक त्यांच्या परीने दानधर्म करतात.दुकानदार व्यापारी तर गल्ल्यावरच सुट्टी नाणी ठेवतात.काहीजण लाडू, बुंदी, केळी, बिस्कीट, बटर ठेवतात.दारात येणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्याला या दिवशी काही ना काही दान करतात.
भिकाऱ्यांनीही या गुरुवारच्या दानधर्माचे इंगीत ओळखले आहे.आणि त्या दिवशी कोल्हापुरात झुंडीने भिकारी दिसणार हे ठरलेलेच आहे.त्याहून आणखी वास्तव असे की, मिरज, सांगली, इचलकरंजी पासून हे भिकारी सकाळी नऊ दहापर्यंत रेल्वेने विना तिकीट कोल्हापुरात येतात.हे सर्व भिकारी काही वर्षांपूर्वीपर्यंत ताराबाई पार्क हॉटेल वृषाली समोरच्या चौकात एकत्र यायचे.व एकाच मार्गाने सर्वांनी भीक मागायला जायला नको.म्हणून मार्ग ठरवून गटागटांनी भीक मागायचे.आता मात्र ते एकत्र येत नाहीत.स्वतंत्रपणे भीक मागण्यासाठी बाहेर पडतात.यल्लमा मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर परिसरात दिवसभर बसणारे बहुतेक भिकारी कुष्ठरोग संसर्गित आहेत.त्यांनी भीक मागू नये, स्वाभिमानाने जगावे यासाठी नक्कीच काही संस्थानी त्यांना आधार दिला आहे. पण काही कुष्ठरोग संसर्गितांचा ओढा भीक मागण्याकडे कायम राहिला आहे.त्यामागे दिवसभरात 500-600 रुपयांची रोख कमाई हे मुख्य कारण आहे.
Previous Articleपुण्यात G-20 परिषदेला सुरूवात; नारायण राणेंनी केले उद्घाटन
Next Article जिह्यातील 5 हजार कुटुंब होणार गॅस सिलेंडरमुक्त









