वृत्तसंस्था / मुंबई
2025 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होत आहे. दरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याला किरकोळ दुखापतीमुळे या स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने हुकणार आहेत. बुमराह मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.
नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतही दुखापतीमुळे बुमराहने आपले सहभाग दर्शविला नव्हता. येत्या जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून उभय संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बुमराह लवकर तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर बुमराहची भारतीय संघाला नितांत गरज आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचे पहिले दोन सामने अनुक्रमे 23 मार्च आणि 29 मार्च रोजी होणार आहेत. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना चेन्नईत तर मुंबई आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना अहमदाबादमध्ये खेळविला जाईल. त्यानंतर मुंबईचे सामने 4 आणि 7 एप्रिलला होणार आहेत. आयपीएल स्पर्धेतील पुढील काही सामन्यांसाठी बुमराह उपलब्ध राहील, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.









