वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवार 10 जुलैपासून खेळविला जाणार आहे. भारतीय संघाने मंगळवारी किमान तीन तास कसून सराव केला. या तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहचे पुनरागमन होत आहे. या सराव सत्रामध्ये बुमराहने बराच वेळ गोलंदाजीचा सराव केला. ही तिसरी कसोटी लॉर्डस् मैदानावर होत आहे.
लॉर्डस्ची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल राहील. त्यामुळे या सराव सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांना फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर अधिक सराव केला. सुमारे 50 मिनिटे बुमराहने नेटमध्ये गोलंदाजी केली. एजबेस्टनच्या दुसऱ्या कसोटीत बुमराहचा सहभाग नव्हता. कर्णधार गिलच्या सलग दोन शतकांच्या जोरावर तसेच आकाशदीप, मोहम्मद सिराज, जैस्वाल, पंत आणि अष्टपैलू जडेजा यांच्या शानदार कामगिरीने भारताने या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा मोठा पराभव करत मालिकेत बरोबरी साधली. आता ही मालिका अधिक रंगतदार अपेक्षित आहे. या सराव सत्रामध्ये गिल, के. एल. राहुल, जैस्वाल, पंत, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी उपस्थिती दर्शविली नाही. कारण पहिल्या दोन सामन्यात या खेळांडूंवर अधिक ताण पडला होता. तसेच दुसऱ्या कसोटीनंतर केवळ तीन दिवसांच्या अंतराने लॉर्डस्ची तिसरी कसोटी होत असल्याने संघव्यवस्थापनाकडून कांही खेळाडूंना सराव सत्रासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. करूण नायर आणि साई सुदर्शन यांनी या सत्रात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला.









