वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने निवडलेल्या 2024 या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात भारताच्या जसप्रित बुमराह, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा व युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यांना स्थान मिळाले आहे.
या संघात न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनसह दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे तर ऑस्ट्रेलियाच्या फक्त कमिन्सची या ऑल स्टार इलेव्हन संघात निवड झाली आहे. बुमराहने मागील वर्षात 14.92 च्या सरासरीने सर्वाधिक 71 बळी मिळविले, त्यापैकी 32 बळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत मिळविले. जडेजाने मागील वर्षी 29.27 च्या सरासरीने 527 धावा जमविल्या आणि गोलंदाजीत 24.29 च्या सरासरीने 48 बळी मिळविले. यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन द्विशतकांसह 712, बांगलादेशविरुद्ध चार डावात 3 अर्धशतके आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 391 धावा जमविल्या. कॅलेंडर वर्षात त्याने 54.74 च्या सरासरीने एकूण 1478 धावा जमवित सर्वाधिक धावा जमविणाऱ्यांत दुसरे स्थान मिळविले. जो रूटने 1556 धावा जमविल्या.
आयसीसीचा ऑल स्टार कसोटी संघ : कमिन्स (कर्णधार, ऑस्ट्रेलिया), जैस्वाल (भारत), बेन डकेट (इंग्लंड), केन विल्यम्सन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड), कमिंदू मेंडिस (लंका), जेमी स्मिथ (इंग्लंड), रवींद्र जडेजा (भारत), मॅट हेन्री (न्यूझीलंड), बुमराह (भारत).









