सहा महिने मैदानाबाहेर राहावे लागण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पाठीच्या वारंवार होणाऱ्या दुखापतीशी झुंजत असलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो सहा महिने मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रौढांच्या मणक्याच्या स्थितीचे व्यवस्थापन आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेत तज्ञ असलेले ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रोवन शौटेन यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
बुमराह आता सहा महिने मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याला आशिया कपला मुकावे लागले. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
सदर 29 वर्षीय खेळाडू गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन टी-20 सामने खेळला. त्यानंतर त्याला बाहेरच राहावे लागलेले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या मालिकेतून माघार घेतली आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघातही त्याला स्थान मिळू शकले नाही. निवड समितीने त्याला जानेवारीतील श्रीलंकेविऊद्धच्या मायदेशी झालेल्या मालिकेसाठी निवडले होते. परंतु त्याला पुन्हा दुखापतीमुळे वगळावे लागले होते.









