गोवा डेअरी भ्रष्टाचार प्रकरण : चौदा संचालकांची सहकार कारकीर्द येणार सुंपष्टात,सहकारक्षेत्रातील कडक कारवाई
पणजी : गोवा डेअरीतील भ्रष्टाचार प्रकरणी सहकार निबंधकांनी एप्रिल 2023 मध्ये अपात्र ठरविलेल्या 14 संचालकांना जोरदार दणका दिला असून यासाठी सर्व 14 ही संचालकांना ते ज्या संस्थांमधून गोवा डेअरीवर आले होते, त्यांच्या मूळ दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या प्राथमिक सदस्य पदावरून हटविण्याचे आदेश संबंधित सोसायट्यांना जारी केले आहेत. ज्या संस्था त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करीत नाहीत, त्या संस्थांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवा सहकार कायदा अस्तित्वात आल्यापासून एवढी कडक कारवाई गोव्यात प्रथमच करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केलेले आहे. त्यावर सुनावणी पुढील दोन दिवसांत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे प्राथमिक संचालक सदस्यत्वही गोठविण्यात येत असल्याने त्यांची सहकार क्षेत्रातील कारकिर्दच आता सुंपष्टात येणार आहे.
संचालक चळवळीतून बाहेर
सहकार खात्याचे उपनिबंधक सीताराम गुरुदास सावळ यांनी हा ऐतिहासिक निर्णय गोवा सहकार कायदा 2001 अन्वये कलम 59 (11) नुसार तसेच कलम 60 (19) (फ) नुसार ही कारवाई केली आहे. त्यांनी दिलेल्या या कडक निर्णय वजा आदेशामुळे गोवा डेअरीचे 14 ही संचालक कायमस्वरुपी सहकार चळवळीतून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यांची सहकार चळवळ संपुष्टात आली आहे. गोवा डेअरीच्या संचालक मंडळाविरोधात सहकार निबंधकांकडे आलेल्या अनेक तक्रारीनंतर सहकार निबंधकांनी सुमोटो दि. 7 जुलै 2021 रोजी गोवा डेअरीच्या 18 संचालकांविरोधात कारण दाखवा नोटीस बजावली होती. गोवा सहकार कायदा 2001 अन्वये तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये ? अशा आशयाची नोटीस बजावली होती.
प्राथमिक सदस्यत्व गोठवण्यात आलेले संचालक
सोमनाथ सहकारी दुग्ध उत्पादकचे राजेश कृष्णा फळदेसाई, शांतादुर्गा सहकारी दुग्धचे विठोबा दत्ता देसाई, मेणकुरे दुग्ध उत्पादकचे गुरुदास केशव परब, कपिला सहकारी दुग्धचे आत्माराम माधव सहकारी, श्री कामधेनूचे धनंजय नंदा देसाई, नवजीवनचे माधवराज शिवाजीराव देसाई, काकोडा दुग्ध उत्पादकचे बाबुराव श्रीकांत देसाई, श्री महामायाचे विजयकांत विठोबा गावकर, श्री रुद्रेश्वर शिवानंद पेडणेकर, पत्रादेवी दुग्ध सोसायटीचे राजेंद्र व्हाय. सावळ, जनता उत्कर्षचे उल्हास सिनारी, बांदीवाडी सहकारी दुग्धचे अजय लक्ष्मीकांत देसाई, भूमीपुरुष दुग्धचे बाबू नरहरी कोमरपंत व ओर्ला दुग्ध सोसायटीचे आलेक्सो फुर्तादो यांचा समावेश आहे.
प्राथमिक सोसायटीचे पद गोठवले
सहकार निबंधकांनी 21 एप्रिल 2023 रोजी या सर्व संचालकांना अपात्र ठरविले होते. अपात्र ठरविल्याने त्यांचे गोवा डेअरीवरील संचालकपद सहकार कायदा 2001 च्या कलम 60 नुसार रद्द झाले होते. कलम 59 (11) अन्वये वरील सर्व सदस्य हे अपात्र ठरल्याने कलम 60 (19) (फ) नुसार ते ज्या प्राथमिक सहकारी सोसायटीच्या माध्यमातून गोवा डेअरीवर पोहोचले होते त्यांचे प्राथमिक दुग्ध सोसायटीवरील संचालकपद आपसूकच रद्द होते. हे सर्व संचालक हे त्या त्या भागातील सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे प्राथमिक सदस्यत्व गोठवून टाकलेले आहे. या अनुषंगाने सीताराम सावळ यांनी सर्व सहकारी सोसायटींना दि. 11 सप्टेंबरपर्यंत त्यांचे प्राथमिक संचालक सदस्यत्व रद्द करून टाका व तशी कारवाई करा आणि अहवाल सहकार निबंधक कार्यालयाला पाठवा. ज्या संस्था असा निर्णय घेणार नाहीत त्या सोसायटींच्या संपूर्ण संचालक मंडळावरच कडक कारवाई केली जाईल, असा आदेश जारी केला आहे. गोव्यात नवा सहकार कायदा 2021 मध्ये कार्यान्वित झाल्यापासून एवढी मोठी कारवाई कधीच झाली नव्हती. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात स्वाहाकार करणाऱ्यांना जरब बसणार आहे.
डॉ. अजित कोसंबे ठरले शिल्पकार
गोवा डेअरीमध्ये जी काही भ्रष्टाचाराने बजबजपुरी माजली होती, त्याविरुद्ध सुरुवातीपासून गोवा डेअरीमधील वरिष्ठ अधिकारी डॉ. अजित कोसंबे आणि रमेश नाईक या दोघांनी जबरदस्त लढा दिला आहे. भ्रष्टाचारी प्रकरणे उघडकीस आणल्यामुळे कोसंबेंना गोवा डेअरीमधून तीन वेळा निलंबित केले व एकदा काढून टाकले. कोसंबे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला व ते जिंकले. मात्र त्यांनी आपली मोहीम चालूच ठेवली. परिणामी गोवा डेअरीमधील 14 ढुढ्ढाचार्याना घरी पाठविण्यात व त्यांची सहकार क्षेत्रातील कारकीर्द संपुष्टात आणण्यात कोसंबे यांना यश प्राप्त झाले. भ्रष्टाचाराविरोधात लढ्याचे शिल्पकार डॉ. कोसंबे ठरले.









