अरुणाचल प्रदेशच्या चीनच्या सीमेवरील तवांग येथे भारत-चीन लष्करामध्ये दि. 9 डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीची काही दृष्ये आता व्हिडीओवर व्हायरल झालेली दिसतात. भारतीय लष्कराने घुसखोर चीनच्या लष्करावर जमेल त्या पद्धतीने हल्ला चढवून चीनच्या जवानांना ज्या पद्धतीने हाकलवून लावले, पिटाळून लावले ते पाहता भारतीय लष्कर फार आक्रमक झालेले दिसते आहे व तसे करण्याची आवश्यकता होतीच. भारतीय संसदेचे अधिवेशन सुरु असून त्यात विरोधकांनी यावर आवाज उठवला. तर तिकडे अमेरिकेने चीनच्या सीमेवरील स्थिती नियंत्रणाकरीताच्या प्रयत्नांना भारताला पाठिंबा देत दिलासा दिला असून यातून दादागिरी नहीं चलेगी हेच प्रतित होताना दिसले. संसदेत विरोधकांनी याविषयी गदारोळ माजवून, सभात्याग केला. भारताला आपल्या सीमेवर डोळय़ात तेल घालून लक्ष देणे आवश्यक ठरले आहे. एकाच वेळी चीन आणि दुसऱया बाजूने पाक आक्रमण करण्याची तयारी करीत आहे. पाकिस्तानची शक्ती जरी चीन असली तरी सध्या चीनला अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागत आहे. चीनने मोठय़ा प्रमाणात शेजारील राष्ट्रांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. चीन हे राष्ट्र फार धूर्त आणि अत्यंत स्वार्थी आहे. यापूर्वी या राष्ट्राने श्रीलंकेत मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून श्रीलंकेची काही बंदरे आपल्या घशात घातली. श्रीलंकेला चीनने कंगाल करून टाकले. पाकिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली. तिबेटवर चीनने कब्जा मिळविला. भारतातील अरुणाचल प्रदेशच्या बाजूची काही एकर जमीन चीनने फार वर्षांपूर्वी आपल्या घशात घातली होती. आताही संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर चीन दावा करू पाहतो आहे. अलीकडेच आलेल्या एका अहवालात सध्या चीनच्या ताब्यात जेवढी जमीन आहे, त्यातील 48 टक्के जमीन ही शेजारील राष्ट्रांशी दादागिरी करून या जमिनी त्याने बळकावलेल्या असल्याचे नमूद झाले आहे. चीनची भारतावर कैक वर्षांपासून वक्रदृष्टी आहे. गेली कित्येक वर्षे चीनच्या असंख्य वस्तू भारतात येत राहिल्या. भारतातील अनेक बाजारपेठा चीनी वस्तूंनी काबिज झाल्या होत्या. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यापासून त्यांनी हळूहळू चीनचे भारतीय बाजारपेठांतील आक्रमण थोपवून धरले. नव्हे, चीनच्या वस्तूंवर बंदीच घातली. देशाला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी भारताने जी आक्रमक भूमिका घेतली, त्यातून चीनचा तीळपापड झाला. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे शक्य होईल तिथे अडविण्याचा व भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चीनने केला मात्र सर्व ठिकाणी चीनला अपयश आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पाठराखण करणाऱया चीनने पाकिस्तानचा देखील वारंवार घात केलेला आहे, हे पाकच्या अजूनही लक्षात येत नाही. भारत-चीन यांच्यातील वैरत्व हे कैक वर्षांपासूनचे आहे. भारत-चीन दरम्यान 1950 मध्ये दोन्ही राष्ट्रांदरम्यान समझौता झाला खरा मात्र भारताची सीमेवरील काही जमीन चीनच्या घशात गेली, हे कटू सत्य आहे. त्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन भाई-भाई, अशा घोषणाही दिल्या होत्या. चीन कायमचाच अस्वस्थ आहे. भारताला त्रास देण्यासाठी चीनने अनेक युक्त्या शोधून काढल्या. प्रत्येकावर भारताने आतापर्यंत मात केली. गेल्या वर्षी तवांग येथे भारत-चीन दरम्यान लष्करी संघर्ष हातघाईवर आलेला असता भारताने चीनच्या अनेक घुसखोरांचा खात्मा केला होता. दोन्ही राष्ट्रांदरम्यान सीमेवर एक समझौता झालेला आहे. निःशस्त्र पद्धतीने मुकाबला करण्याचा. त्यामुळे हातघाईवर आलेल्या या प्रकरणातून चीनच्या अनेक जवानांना भारतीय सैन्याने कायमस्वरुपी अद्दल घडविली होती. असे असताना चीनच्या तीनशे जवानांनी 9 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा तवांग येथे घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केला, भारतीय लष्कराने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत परतवून लावले. आपल्या जवानांनी जे शौर्य दाखविले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. चीन वारंवार भारतावर गेली अनेक वर्षे दबाव आणीत होता. चीनने भारतावर आक्रमण केले तर काय होईल? भारताचे प्रचंड नुकसान तर होईलच परंतु भारत काही एकाकी पडणारा देश नाही. अमेरिकेने बुधवारी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. भारत-चीनमधील जवानांच्या संघर्षाची गंभीर दखल जेव्हा अमेरिका घेतो, याचा अर्थ भारत हा काही एकटा नाही. भारताला सहकार्य करण्यास अनेक राष्ट्रे रांगेत आहेत. चीनच्या आशिया खंडातील दादागिरीला भारतच चोखपणे उत्तर देऊ शकतो, एवढी क्षमता भारताची आहे. भारत आज विविध शस्त्रांनी सुसज्ज आहे, याची जाणीवही चीनला आहे. त्यामुळे भारतावर आक्रमण करणे चीनला परवडणारे नाही. चीनची घुसखोरी रोखणाऱया भारतीय जवानांनी दाखविलेले शौर्य हे वाखाणण्याजोगे आहे. भारतावर मोठय़ा प्रमाणात आक्रमण करण्याची तयारी चीन गेली काही वर्षे करीत आहे. दुसऱया बाजूने संपूर्ण तैवानच आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न चीन करीत आहे व हा प्रयत्नदेखील चीनच्या अंगलट आलेला आहे. जपान व अमेरिका हे देशदेखील तैवानच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. चीनची वाढती दादागिरी हा जरी आपल्यासाठी चिंतेचा विषय असला तरीदेखील भारत आज सशस्त्र सुसज्ज आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाने अनेक मित्रराष्ट्र निर्माण केले आहेत. त्यामुळे चीनला भारताशी संघर्ष करणे, हे तसे परवडण्याजोगे नाही. भारतीय सीमेवर वारंवार घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न असतो. प्रत्येकवेळी आपल्या सैनिकांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलेले आहे. 9 डिसेंबर रोजी भारतीय हद्दीतील चीन सैनिकांना बदडून काढताना भारतीय लष्कराने लाठय़ा-काठय़ांचा वापर केलेला आहे. चीनचे सैन्य कावरे-बावरे होऊन परतले खरे परंतु चीन तसा गप्प बसणारा नाही. पुन्हा एकदा भारतावर आक्रमण करण्यासाठी नवी चाल खेळणार, या दृष्टिकोनातून भारतानेदेखील सज्ज राहण्याचे ठरवले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वाच्ाs व सावधपणे निर्णय घेतलेले आहेत. दादागिरी परतावून लावण्यास भारत सज्ज आहे.
Previous Articleबेकायदेशीर व्यवसाय, दलालांना रोखा
Next Article तवांगप्रश्नी अमेरिका भारताच्या पाठीशी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








