गडहिंग्लज प्रतिनिधी
येथील प्रगतिशील शेतकरी काशिनाथ बेळगुद्री यांच्या ‘सरपंच-आमदार’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या बैलजोडीला साडेसहा लाख इतका विक्रमी दर मिळाला आहे. खिल्लार जातीच्या या बैलजोडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्याच्या पांडुरंग चौधरी यांनी ही बैलजोडी 6 लाख 50 हजाराला खरेदी केल्याचे सांगितले. गडहिंग्लज परिसरात बैल जोडीला विक्रमी दर मिळाल्याने सर्वत्र हा विषय चर्चेचा ठरला आहे.
गडहिंग्लजला नुकत्याच पार पडलेल्या सदृढ बैलजोडी स्पर्धेत बेळगुद्री यांच्या ‘सरपंच-आमदार’ बैलजोडीने यश मिळवले होते. त्यामुळे ही बैलजोडी चांगलीच चर्चेत आली होती. गडहिंग्लजच्या स्पर्धेत ‘सरपंच-आमदार’ ही जोडी लक्षवेधी ठरली होती. रुबाबदार जोडीमुळेच बैलजोडीला अधिक दर आला आहे. खिल्लार जातीची ही बैलजोडी देखणी आहे. पुणे परिसरात बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी जातिवंत बैलजोडी प्रतिष्ठेची मानली जाते. बैलपोळ्यासाठी चौधरी कुटुंबीयांनी गडहिंग्लजातून सदर बैलजोडी खरेदी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, भैरू डोमणे, अरविंद पाटील, अशोक शिंदे यांची उपस्थिती होती. श्री. बेळगुद्री यांनी ही बैलजोडी दोन महिन्यापूर्वी बावची (जि. सांगली) आणि उपारहट्टी (जि. बेळगाव) या ठिकाणाहून खरेदी केली होती. त्यांच्या या बैलजोडीला मिळालेल्या दरामुळे सर्वत्र हा विषय चर्चेचा झाला आहे. अनेक पिढ्यापासून शेतीचा वारसा चालवणारे काशिनाथ बेळगुद्री हे प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. आजही शेतीची सर्व कामे ते बैलजोडीच्या मदतीनेच करत असतात. जातिवंत गाई, म्हशीबरोबर खिल्लारी बैलजोडी ते आवर्जून बाळगतात. त्यांना जातीवंत जनावरे बाळगण्याची हौस असल्याचे सांगितले जाते.








