शिवसेनेच्या पंचायत समिती माजी सदस्यासह दोघांवर गुन्हा, तपास सुरू
चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण-कराड मार्गावरील अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यासमोर बैलांची बेकायदा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 5.15 वाजता पकडली. यासाठी भगवान कोकरे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांनी दिलेल्या तकारीवरून शिवसेनेच्या पंचायत समिती माजी सदस्यांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सुरू असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ बाबू ठसाळे (धामेली), दयानंद दत्ताराम जाधव (कालुस्ते) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची तकार भगवान कोकरे यांनी दिली. या तकारीत म्हटले आहे की, सोमवारी आपण पोफळी येथून कीर्तन सेवा संपवून चिपळूणकडे घरी जात असताना आपल्या मोबाईलवर फोन आला की, एका गाडीतून चिपळूण ते पाटण अशी गोवंशाची वाहतूक होत आहे. त्यानुसार आपण पिंपळीखुर्द येथे थांबून दिलेल्या माहितीनुसार, गाडीची वाट पाहत होतो. थोड्यावेळात ती गाडी आली असता त्याची माहिती अलोरे-शिरगाव पोलिसांना दिली.
तसेच गाडीच्या पाठीमागून अलोरे पोलीस स्थानकापर्यंपत पोहोचलो. यावेळी पोलिसांनी ही गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत 2 बैल आढळले. त्यानंतर रघुनाथ ठसाळे यांनी आपल्याकडे गोवंश वाहतुकीचा परवाना असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी बैलांची वैद्यकीय तपासणी केली आहे का? असे विचारले असता त्यांनी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपण पशुसंवर्धन उपायुक्त धनंजय जगदाळे यांना फोन करून खात्री केली असता त्यांनी कोणीही बैलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आले नसल्याचे सांगितले. तसेच लम्पी रोगाचा प्रादुर्भाव चालू असल्याने शासनाने संपूर्ण राज्यात प्राण्यांच्या वाहतुकीस बंदी घातलेली आहे. लम्पी रोगाच्या प्रादुर्भाव काळात कोणत्याही प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी परवाना देता येत नसल्याचे स्पष्ट केले. तरीही रघुनाथ ठसाळे व दयानंद जाधव यांनी बैलांची वैद्यकीय तपासणी न करता परजिह्यात वाहतूक करून बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी रघुनाथ ठसाळे व दयानंद जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांची चौकशी सुरू आहे. या बाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. नरेंद्र चव्हाण करीत आहेत.
तालुक्यात खळबळ
गुरांची वाहतूक केल्यापकरणी पंचायत समितीचे माजी सदस्य ठसाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच ते शिवसनेचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्याकडून असे कृत्य झाल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.