चिपळूण :
भरदिवसा गोळीबार झाल्याने बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून सदनिकेच्या स्वयंपाक घरात घुसल्याची खळबळजनक घटना शहरातील गोवळकोट रोड येथील हायलाईफ या इमारतीमध्ये रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या खिडकीजवळ कोणीही नसल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर त्या परिसरात मोठी घबराट पसरली असून इमारतीलगत असलेल्या शेतीच्या दिशेहून अज्ञाताच्या बंदुकीतून ही गोळी आली असावी अशी चर्चा आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे.
शहरातील इतर विस्तारित ठिकाणामध्ये गोवाळकोट रोडचा देखील समावेश आहे. त्याठिकाणी अपार्टमेंटची असलेल्या संख्या सर्वाधिक असून हा परिसरात कायमच गजबलेल्या स्थितीत असतो. गोवाळकोट रोड ठिकाणी हायलाईफ ही तीन मजली इमारत असून त्यामध्ये पहिल्या मजल्यावर अशरफ तांबे यांची सदनिका आहे.
रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अशरफ तांबे यांच्या या सदनिकेच्या स्वयंपाक खोलीमध्ये मोठा आवाज झाला. यावेळी घरातील व्यक्तीही त्याठिकाणी येऊन पाहिले असता यावेळी बंदुकीची एक गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वयंपाक घरात घुसलेली होती. या गोळीमुळे या खिडकीच्या काचेला एक छिद्र देखील पडले आहे.
याबाबतची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घबराट पसरली आहे. तांबे यांच्या इमारती शेजारी मोठ्या प्रमाणात शेती आहे. सध्या त्याठिकाणी शेतीची कामे सुरु आहेत. त्यादिशेहून आलेली गोळी शिकारीच्या उद्देशाने अज्ञाताने झाडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
- बंदुकीतील ती गोळी छऱ्याची
खिडकीची काच फोडून थेट स्वयंपाकघरात घुसलेली गोळी ही छऱ्याची आहे. तांबे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.








