2 हजारांहून अधिक घरे-दुकाने जमीनदोस्त : 3 हजार जवान तैनात
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबाद येथील चंदोला तलाव क्षेत्रात मंगळवारपासून बांगलादेशी घुसखोरांच्या अवैध बांधकामांवर पुन्हा बुलडोझर अॅक्शन सुरू झाली आहे. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक घरे-दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत. गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच या कारवाईची तयारी सुरू केली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी 50 बुलडोझर आणि 50 डंपर तसेच 25 हिताची मशीन्सचा वापर करण्यात आला. याचबरोबर 3 हजार पोलीस जवानांना तैनात करण्यात आले.
29 एप्रिल रोजी या भागात अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेचा पहिला टप्पा राबविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील कारवाई 5 दिवसांपर्यंत चालली होती. त्यादरम्यान 500 हून अधिक घरे-दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. तर पेलिसांनी येथून 890 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले होते. यातील 243 लोकांची बांगलादेशी नागरिक म्हणून ओळख पटली आहे. उर्वरितांची चौकशी सुरु आहे. यातील 143 बांगलादेशींना डिपोर्ट देखील करण्यात आले आहे.
मिनी बांगलादेशी असे नाव
चंदोला तलावाचा हा भाग अहमदाबादमध्ये असून याला मिनी बांगलादेश या नावाने देखील ओळखले जाते. हे क्षेत्र 1200 हेक्टरमध्ये फैलावलेले आहे. हा पूर्ण भाग गुन्हेगारी कारवायांसाठी कुख्यात आहे. याचमुळे तेथील अतिक्रमण हटवत आता पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.
लल्ला बिहारी मुख्य आरोपी
मूळचा अजमेर येथील रहिवासी लल्ला बिहारी हा गुन्हेगार पैसे घेत अवैध बांगलादेशींना येथे वसवित होता असे तपासातून समोर आले आहे. लल्ला बिहारी येथे शेडयुक्त छोट्या खोल्या, दुकाने आणि गोदाम तयार करून ती भाड्याने देत होता. बांगलादेशी घुसखोरांसाठी तो काम देखील मिळवून देत होता. याकरता त्याने रितसर एक पॅकेजच तयार केले होते. परिवारांना वसविण्यासाठी तो 10-12 लाख रुपये घेत होता. या पॅकेज अंतर्गत तो बांगलादेशींच्या वास्तव्यापासून त्यांना बनावट दस्तऐवज देखील तयार करवून देत होता.









