अनेक तऊण हिंसाचारात सहभागी : काही बांगलादेशींकडूनही पाठबळ मिळाल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ चंदीगड, नूह
हरियाणातील नूह येथे 31 जुलै 2023 रोजी हिंदूंच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर कट्टरपंथी मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यानंतर हरियाणा सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राज्य सरकारने गुरुवारपासून धडक मोहीम राबवत परिसरातील सुमारे 250 झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवला. या झोपड्या रोहिंग्या घुसखोरांच्या आहेत. या कारवाईवेळी जलद कृती दल तैनात करण्यात आले होते. तत्पूर्वी, गुरुवारी रात्री सरकारने नूह जिह्यातील पोलीस अधीक्षक वरुण सिंघला यांची बदली केली. हिंसाचाराच्या दिवशी ते रजेवर होते. आता सिंघला यांच्याकडे भिवानी जिह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी नरेंद्र बिजार्निया यांना नूहाची जबाबदारी देण्यात आली आहे. बिजार्निया हे भिवानीचे पोलीस अधीक्षक होते.
म्यानमारमधून बेकायदेशीरपणे आलेले रोहिंग्या तावडू भागात राहत होते. या संपूर्ण परिसरात हरियाणा सरकारने बुलडोझर वापरून झोपडपट्टी हटवली आहे. हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अॅथोरिटीच्या जमिनीवर रोहिंग्यांची 250 हून अधिक कुटुंबे गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीर कब्जा करून राहत होती. हे लोक शहर भागात कचरा उचलणे आणि रद्दी गोळा करण्याचे काम करत होते. आता या भागातील बरेच तरुण नूह हिंसाचारात सहभागी होते. दंगल पसरवल्याबद्दल पोलिसांच्या एफआयआरमध्ये अनेक रोहिंग्या तरुणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. यातील काहींना पोलिसांनी अटकही केली आहे.
या बेकायदेशीरपणे स्थायिक झालेल्या वसाहतीत म्यानमार आणि बांगलादेशातील घुसखोर बेकायदेशीरपणे राहत आहेत. सुमारे 4 तास चाललेल्या या कारवाईत 200 हून अधिक झोपड्या पाडण्यात आल्या. यादरम्यान काही मुस्लीम महिलांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कठोरतेनंतर त्या मागे हटल्या. हे घुसखोर मेवातच्या अनेक भागात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे बोलले जात आहे. तावडूशिवाय हे घुसखोर नुहान, पुनहाना, पिंगावन, नगीना आणि फिरोजपूर झिरका येथे शेकडो झोपड्यांमध्ये राहत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.
बंदोबस्तात वाढ
हिंसाचार, तणाव आणि धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचारामुळे नूह, पलवल, फरिदाबाद आणि गुरुग्राम या चार जिल्ह्यांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर मशिदींजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तणावग्रस्त जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या वीस कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कडक सुरक्षा बंदोबस्ताबरोबरच राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट 2023 पर्यंत नूह, पलवल, फरिदाबाद आणि गुऊग्रामच्या सोहना, मानेसर आणि पतौडीमध्ये इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, सीईटी चाचणी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत ही बंदी उठवण्यात आली होती. नूह येथील हिंसाचारात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारप्रकरणी राज्यभरात एकूण 93 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत 186 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 78 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांश 19 ते 25 वयोगटातील आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 2,300 हून अधिक व्हिडिओंचा तपास करत संबंधितांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे.
संशयितांचा अन्य राज्यांमध्ये पोबारा
हिंसाचारानंतर काही तरुणांनी अन्य राज्यांमध्ये आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाली आहे. हिंसाचारानंतर अनेक आरोपी राजस्थानमधील मेवात, जयपूर आणि उदयपूर आणि उत्तर प्रदेशातील मेरठ, आग्रा आणि अलीगढमध्ये लपल्याची माहिती अटकेतील तरुणांनी दिली. त्यानंतर आता त्यांना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. हिंसाचाराच्या तपासासाठी स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) 8 पथके आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची (एसआयटी) तीन पथके तयार करण्यात आली आहेत. हा हिंसाचार सुनियोजित पद्धतीने केल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे.









