प्रशासनाकडून कारवाई : पोलीस अलर्ट
वृत्तसंस्था/ कुशीनगर
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची मुदत संपताच उत्तरप्रदेश प्रशासनाने कुशीनगर येथील मदनी मशिद पाडविण्याची कारवाई रविवारी सुरू केली. पाच बुलडोझरद्वारे शासकीय भूमीत करण्यात आलेले अवैध बांधकाम पाडविण्याचे काम हाती घेण्यात आले. तर खबरदारीदाखल शांतता-सुव्यवस्थेकरता मोठ्या संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
मस्जिदशी संबंधित लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रशासकीय कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर उच्च न्यायालयाने 8 जानेवारीपर्यंतचा स्थगिती आदेश जारी केला होता. 2002 पासून निर्माण करण्यात येणारी चारमजली मदत्नी मस्जिदचे प्रकरण 17 डिसेंबर 2024 रोजी चर्चेत आले होते. तेव्हा भाजप नेते रामबचन सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे शासकीय भूमीवर कब्जा करत हे प्रार्थनास्थळ उभारले जात असल्याची तक्रार केली होती. यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बांधकामाला स्थगिती दिली होती. प्रशासनाने संबंधित लोकांना नोटीस जारी करत शासकीय भूमीवरील अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. पक्षकारांनी त्याच दिवशी कुंपणभिंत पाडली होती, परंतु शासकीय भूमीतील बांधकाम हटविले नव्हते. कारवाईपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.









