वृत्तसंस्था / संभल
उत्तर प्रदेशातील संभल मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार झिया उल बर्क यांच्या इमारतीच्या पायऱ्या उखडण्याची कारवाई संभलच्या प्रशासनाने केली आहे. या कारवाईचा पुढचा टप्पा आता ही बेकायदेशीर इमारत पाडविणे हा असेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली असून बर्क यांच्यावर बुलडोझर करवाई होणार हे निश्चित मानण्यात येत आहे. संभलमध्ये प्रशासनाने अतिक्रमण विरोधी अभियान हाती घेतले असून ते धडाक्याने चालविण्यात येत आहे. बर्क यांच्या बेकायदेशीर इमारतींच्या संदर्भात त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
बर्क यांच्यावर सरकारी वीज अवैधरित्या घेतल्याचाही आरोप आहे. यासाठी त्यांना 1.91 कोटी रुपयांची नोटीसही पाठविण्यात आली आहे. त्यांच्या इमारतींचा वीज पुरवठा आता बंद करण्यात आला असून त्यांचा पाणीपुरवठाही बंद करण्यात आला. संभलमध्ये सध्या वीजकनेक्शन्स तपासण्याचेही अभियान हाती घेण्यात आले असून ज्यांनी बेकायदा कनेक्शन्स घेतली आहेत, त्यांना शोधण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गतच बर्क यांनी बेकायदा वीज घेतल्याचे प्रकरण समोर आले. संभलमध्ये सध्या अनेक अरुंद मार्ग रुंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतली आहे. ही प्रक्रिया नि:पक्षपातीपणाने पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले गेले आहे.









