चव्हाट गल्ली-गोंधळी गल्लीतील घटना : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी चव्हाट गल्लीत अकरा वर्षीय मुलाचा तर गोंधळी गल्लीत एका रेडकाचा चावा घेतला आहे. शनिवारी रात्री आणि सोमवारी सकाळी या दोन्ही घटना घडल्या असून शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. ही माहिती समजताच जखमी रेडकावर उपचार करून त्याला श्रीनगर येथील गो-शाळेत हलविले. तर चव्हाट गल्लीतील मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिवराज जयानंद शंखपुरे (वय 10 वर्षे 7 महिने) रा. चव्हाट गल्ली असे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. शिवराज हा शनिवारी रात्री 7.30 ते 8 च्या दरम्यान दुकानाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता.
रापासून काही अंतरावर गेल्यानंतर 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यामुळे भीतीने आरडाओरड करत शिवराजने तेथून पळ काढला. ही माहिती समजताच कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शिवराजच्या घरची परिस्थिती हलाखीची असून त्याला काही वर्षांपासून मधुमेहदेखील आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरू असतानाच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने कुटुंबीय दुहेरी संकटात सापडले आहे. ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला समजताच सोमवारी सकाळी पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजू संकण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चव्हाट गल्लीला भेट देऊन जखमी मुलाची विचारपूस केली.
त्यावेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी कुटुंबीयांसह रहिवाशांनी केली. ही घटना ताजी असतानाच भटक्या कुत्र्यांच्या कळपाने गोंधळी गल्लीत सोमवारी सकाळी एका मोकाट रेडकावर हल्ला करून जखमी केले. जखमी रेडकू रस्त्याच्या कडेला बसल्याचे काहींच्या निदर्शनास आल्यानंतर ही माहिती महापालिकेला दिली. पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजू संकण्णावर हे सहकाऱ्यांसह दाखल झाले. जखमी रेडकाला श्रीनगर येथील गो-शाळेत हलविले. त्याच्यावर उपचार करण्यासह अॅन्टीरेबिज इंजेक्शन दिले.
एकंदरीत शहर, उपनगर व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. एखाद्या ठिकाणी कुत्र्याने हल्ला केल्यास त्या परिसरातच कुत्र्यांची धरपकड केल्याचा बनाव केला जातो. त्यानंतर ही कारवाई गुंडाळली जाते. कुत्र्यांचे निर्बिजीकरणासाठी आरोग्य विभागाला ठेकेदार मिळत नसल्यामुळे कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या ठेकेदारांकडूनच कुत्र्यांची धरपकड करून त्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. भटक्या कुत्र्यांचा मनपाने बंदोबस्त करावा.









