कुडाळ प्रतिनिधी
मुळदे गावाच्या प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे शिवराम (बाळा) काशीराम पालव यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण गावातीलग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून बस थांबा येथे निवारा शेड बांधली. प्रवाशांच्या सोयीसाठी व पालव यांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी हा राबविलेला सामाजिक उपक्रम आदर्शवत आहे. गेल्या वर्षी 16 जुलै रोजी शिवराम पालव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गावातील ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते.गावात सामाजिक,धार्मिक व सास्कृतिक कार्यात त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. त्यांच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी एखादे समाजपयोगी काम करण्याची संकल्पना ग्रामस्थांच्या चर्चेतून पुढे आली. मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या नजीकच्या मुख्य मार्गावर बस थांबा येथे निवारा शेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गावातून लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवराम पालव यांच्या गावातील योगदाना बद्दल प्रत्येक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी देत खारीचा वाटा उचलला. या लोकवर्गणीतून सदर निवारा शेड बांधून पूर्ण झाली. कै.पालव यांच्या प्रथम स्मृतिदनानिमित्त या शेडचे लोकार्पण करुन त्यांना अनोखी आदरांजली वाहिली.या शेडचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते दिनकर बाबाजी धुरी व कै. शिवराम (बाळा ) पालव यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावातील सर्व मानकरी व ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.









