28 वर्षांमध्ये झाले तयार : घर पाहण्यासाठी लोकांची गर्दी
एका जोडप्याने स्वत:च्या जीवनातील 28 वर्षे खर्च करून एक असे घर तयार केले आहे, जे पाहण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. या घराकरता त्यांनी जुन्या आणि टाकाऊ सामग्रीचा वापर केला आहे. कलाकार मायकल काहन आणि त्यांच्या पत्नी तसेच टेक्सटाइल आर्टिस्ट लेडा लीवेंट यांनी हे घर 1979 मध्ये उभारण्यास सुरुवात केली होती.

मायकल यांनी या घराला एलिफांटे आर्ट हाउस नाव दिले होते. मायकल यांचा 2007 मध्ये मृत्यू झाल्याने घर निर्मितीचे स्वप्न अर्धवट राहिले होते. हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा विडा त्यांच्या पत्नीने उचलला आणि हे घर तयार करण्यासाठी त्यांनी सुमारे 28 वर्षापर्यंत काम केले आहे. हे घर अमेरिकेच्या एरिझोनामध्ये तयार करण्यात आले असून घराचे प्रवेशद्वार अत्यंत वेगळे आहे. हे प्रवेशद्वार दगडांनी तयार करण्यात आले असून छताची उंची देखील अधिक आहे. या घरात शिरल्यावर संबंधिताला एखाद्या गुहेत शिरल्यासारखे वाटू लागते. हे घर रंगबिरंगी असून यात 25 फुटांचे सीलिंग आहे. तर घर तीन एकरमध्ये फैलावलेले आहे. याचबरोबर घरात अत्यंत सुंदरपणे खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत.
घराच्या भिंतींना सिमेंट, दगड, लाकूड आणि काचेचा वापर करत तसेच रबर अन् पाइप्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. घराची जमीन पूर्णपणे समतल नाही, आम्ही याविषयी विचार केला नव्हता, आम्हाला केवळ छत हवे होते. राहण्यासाठी सुंदर जागा, जेथे मातीची भांडी, लाकूड अन् झोपण्याची जागा असावी एवढीच इच्छा होती. निसर्ग या घराला कुठले रुप देतो, हे पाहण्याची इच्छा मायकल यांची होती. आमचे हे घर पाहण्यासाठी आतापर्यंत हजारो लोक आल्याचे लेडा यांनी सांगितले आहे.









