राजधानीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी : पर्रीकरांच्या भूमिकेमुळे मोन्सेरातांची धावाधाव
प्रतिनिधी / पणजी
स्मार्ट सिटीची पणजी शहरातील कामे आणि खड्यात पडून झालेल्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यूबाबत उत्पल पर्रीकर यांनी आवाज उठवल्यानंतर पणजी मनपा अर्थात महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव देसाई हे जागे झाले आणि त्यांनी लवाजम्यासह पणजीतील कामांची पाहणी केली. त्याचा आढावा घेवून सर्व कंत्राटदारांना स्मार्ट सिटीच्या कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पर्रीकरांनी घाव घातल्यानंतर मोन्सेरातांनी धाव घेतल्याचे दिसून आले.
या स्मार्ट सिटीच्या कामांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गंभीर दखल घेतली असून येत्या 10 जानेवारी रोजी या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कंत्राटदार यांची बैठक घेणार आहेत. या कामात येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेऊन मुख्यमंत्री योग्य त्या सूचना करणार आहेत.
या तपासणी कामाच्यावेळी अनेक नगरसेवकांनी त्यांना कंत्राटदाराने विश्वासात घेतले नसल्याची तक्रार केली. आयुष हळर्णकर याचा ज्या ठिकाणी ख•dयात पडून मृत्यू झाला तेथे सुरक्षेची पुरेशी उपाययोजना केली नसल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना विश्वासात घेण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले होते. परंतु त्याचे पालन कंत्राटदारांनी केले नाही असे आता समोर आले आहे. नगरसेवकांनी देखील स्मार्ट सिटीच्या कामात फारसे लक्ष घातले नाही, असेही उघड झाले आहे.
महापौर, उपमहापौरांसमवेत मनपाचे अधिकारी, वाहतूक पोलीस, स्मार्ट सिटी कामाचे अभियंते, अधिकारी पाहणीवेळी उपस्थित होते. पर्रीकर यांनी महापौरांविरोधात आवाज काढून अविश्वास ठराव आणा, असे आवाहन केल्यानंतर महापौर जागे झाल्याचे दिसून आले. पर्रीकरांची टीका महापौरांना चांगली झोंबल्याचे स्पष्ट झाले. पणजीच्या आमदारावरही पर्रीकर यांनी निशाणा साधला होता परंतु मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पाहणी करण्याचे धाडस केले नाही. पणजीचे आमदार बदला असे भावनिक आवाहनही पर्रीकर यांनी केले होते. अपघात झाल्यानंतर पणजी मनपा जागी होणे अपेक्षित होते परंतु मनपा झोपून राहिली आणि पर्रीकरांच्या टीकेनंतर आता जागी झाली असल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांत उपाययोजना करा
स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने 10 जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. या बैठकीला पणजाचे महापौर, स्मार्ट सिटीचे अधिकारी इत्यादींसह सर्व भागधारक उपस्थित राहणार आहेत. पणजीचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात यांनी आज वाहतूक पोलिसांसह स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली. येत्या दोन दिवसांत सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापौरांनी कंत्राटदारांना दिले आहेत.