खानापूर : तेरेगाळी येथील शेतकरी भीमाप्पा हणबर यांच्या म्हशीवर जंगली श्वापदाने हल्ला केल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी लोंढा वनाधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. वाघाने अथवा बिबट्याने म्हशीवर हल्ला केल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाघाच्या हल्ल्यातच म्हैस ठार झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तेरेगाळी येथील शेतकरी भीमाप्पा हणबर यांनी आपली जनावरे जंगलात चरावयास सोडली होती. मात्र एक म्हैस परत आली नसल्याने त्यांनी शोधाशोध केली असता जंगलाच्या बाजूला म्हैस मृतावस्थेत आढळून आली. म्हशीवर हल्ला करून मानेकडील भाग आणि डोके पूर्णपणे खाल्ल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती लोंढा विभागाच्या वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. लोंढा वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. नुकसानभरपाई देण्याबाबत वनाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
याबाबत लोंढा विभागाचे वनाधिकारी वाय. पी. तेज यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, म्हशीवर वाघ अथवा बिबट्याने हल्ला केला आहे. हल्ल्याचे स्वरुप पाहता वाघ अथवा बिबट्याने हल्ला केला आहे. प्राण्यांवर हल्ला करायची पद्धत वाघाची आणि बिबट्याची सारखीच असल्याने हल्ला कोणी केला हे स्पष्ट झाले नाही. शेतकऱ्याला शासनाच्या निर्देशानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, असे वाय. पी. तेज यांनी सांगितले.









