शेतकऱ्याला एक लाखाचा फटका
बेळगाव : चरावयास सोडलेल्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बसवण कुडची येथे सोमवारी घडली आहे. त्यामुळे शेतकरी जिन्नाप्पा वंडरोट्टी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, हेस्कॉमच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. शेतकरी जिन्नाप्पा यांच्या सहा म्हशी असून ते दररोज म्हशी चरावयास सोडतात. देवराज अरस कॉलनी येथून जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रान्स्फॉर्मरजवळ म्हैस गेली असताना विजेचा धक्का बसल्याने म्हैस जागीच ठार झाली. नजीकच सरकारी मराठी शाळा आहे. शाळेच्या गेटजवळच हा धोकादायक ट्रान्स्फॉर्मर असून ट्रान्स्फॉर्मरमधून वीज प्रवाहीत होत असल्याने म्हशीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याबाबत नगरसेवक आणि एसडीएमसीने देखील दुर्लक्ष केले आहे. इतकेच नव्हे तर हेस्कॉम अधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून गावात सात ते आठ वीजखांब धोकादायक बनले आहेत. तरीदेखील त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
म्हैस मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे हेस्कॉमने शेतकऱ्याला भरपाई द्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









