हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका
बेळगाव : वीजवाहिनीचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना गोजगा (ता. बेळगाव) येथे घडली आहे. शिवारात तुटून पडलेल्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाल्याने दाजीबा शहापूरकर या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे पंधरा दिवसात दोन म्हशींचा मृत्यू झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. वेळच्यावेळी वीजवाहिनीची दुरुस्ती न केल्यामुळे वीजवाहिन्या तुटत आहेत. रविवारी गोजगा गावानजीकच्या शिवारात विद्युतवाहिनी तुटून गवतामध्ये पडली होती. चरण्यासाठी गेलेल्या म्हशीचा वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्या ठिकाणी मनुष्यहानी टळली. यामुळे शेतकरी दाजीबा शहापूरकर यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी बसवाण कुडची येथे वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता. दुभत्या जनावरांवरच शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यातच अशाप्रकारे हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. या घटनेची माहिती सोमवारी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून नुकसानभरपाईची मागणी होत आहे.









