बेळगाव : के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बुफा एफसीने फँको एफसीचा तर फास्ट फॉरवर्डने स्वस्तिक एफसीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. नझीब इनामदार व शहिद अत्तार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या राहुल के. आर. शेट्टी फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बुफा एफसीने फँको एफसीचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला बुफाच्या माविया उस्तादने पहिला गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. 28 व्या मिनिटाला माविआच्या पासवर नझीब इनामदारने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला फँकोच्या तेजस पाटीलने गोल करण्याची संधी वाया घालविली. 43 व्या मिनिटाला नझीब इनामदारच्या पासवर शईद अत्तरने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
45 व्या मिनिटाला फँकोच्या अभिनंदनच्या पासवर तेजस पाटीलने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. दुसऱ्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड एफसीने स्वस्तिक एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या इदायतने गोल करण्याची सोपी संधी वाया घालविली. 25 व्या मिनिटाला स्वस्तिक एफसीच्या अगस्टीन पिरकीने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 52 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या अमिरच्या पासवर नदीम मकानदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे तौसीफ बेपारी, पुनीत शेट्टी, अॅड. व्ही. बी. पाटील, मैनुद्दीन पठाण, सुंदर, जेष्ठ फुटबॉलपटू नकीब सिद्दकी, प्रणय शेट्टी यांच्या हस्ते दोन्ही सामन्यातील सामनावीर नझीब इनामदार, शाहिद अत्तार, व इम्पॅक्ट खेळाडू तेजस पाटील व राहुल पंतोजी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









