राहुल के. आर. शेट्टी चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : के. रत्नाकरशेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित राहुल के. आर. शेट्टी चषक वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी बुफा एफसीने ब्रदर्स एफसीचा तर फास्ट फॉरवर्ड एफसीने शिवाजी कॉलनी एफसीचा पराभव करून विजयी सलामी दिली. माविआ उस्ताद व आझनान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या राहुल के. आर. शेट्टी फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशपाक घोरी, मुजमिल डोणी, इम्रान फतेखान, प्रशांत वांडकर, अमजान मोमीन, मोहित पठाण, पवन कांबळे प्रणय शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, राहुल मगदूम व चेतन कोठारी आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चेंडूला किक करून व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात बुफा एफसीने ब्रदर्स एफसीचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला बुफाच्या माविया उस्तादने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
28 व्या मिनिटाला माविआच्या पासवर नजिम इनामदारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 43 व्या मिनिटाला नजिम इनामदारच्या पासवर सुफियन सय्यदने गोल करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ब्रदर्स एफसीला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड एफसीने शिवाजी कॉलनी एफसीचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या इदायतने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 37 व्या मिनिटाला शिवाजी कॉलनी एफसीच्या आर्यनने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. 45 व 52 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या नदीमने सलग 2 गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर अशपाक घोरी, मुजमिल डोणी, इम्रान फतेखान यांच्या हस्ते पहिल्या सामन्यातील सामनावीर माविया उस्ताद व इम्पॅक्ट खेळाडू रौफ चौधरी, दुसऱ्या सामन्यातील सामनावीर आझनान व इम्पॅक्ट खेळाडू कृष्णा मुचंडी यांना प्रमुख पाहुणे पवन कांबळे, राकेश कांबळे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
शुक्रवारचे सामने
1) युनायटेड गोवन्स एफसी वि. आयबीसीटी, सायं. 6 वा. 2) साईराज वि. निपाणी, रात्री 7.30 वा.









