सरकार अन् विरोधक यांच्यातील चर्चा निष्फळ : जेपीसी अन् राहुल गांधींच्या वक्तव्यावरून गोंधळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील गोंधळ सुरूच आहे. लोकसभेतील गदारोळ दूर करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी बोलाविली बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीत सत्तारुढ आणि विरोधी पक्ष स्वतःच्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. बैठकीत लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी सत्तारुढ आणि विरोधकांना संसदेचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले होते.
संसदेतील पेच दूर करण्यासाठी बिर्ला यांनी सत्तारुढ पक्ष तसेच विरोधी पक्षांना स्वतःच्या मागण्या बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. लोकसभा अध्यक्षांच्या आवाहनानंतरही सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले. लोकसभा अध्यक्षांनी सोमवारी देखील विविध नेत्यांची चर्चा करत पेच दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
कामकाज पूर्णपणे ठप्प
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेससमवेत सर्व विरोधी पक्ष अदानी मुद्दय़ावर चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी भूमिका भाजपने घेतली आहे. याचमुळे 13 मार्चपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया सत्रात कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. या सत्रात अर्थसंकल्पावर चर्चा आणि ते संमत करवून घ्यावे लागते. अशा स्थितीत आता चर्चेशिवायच 23 मार्च रोजी अर्थसंकल्प मंजूर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर 23 मार्च रोजी अर्थसंकल्प मजूर झाल्यावर हे सत्र मुदतीपूर्वीच संपविले जाऊ शकते.
काँग्रेसचा आरोप
संसदेतील गोंधळादरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीची मागणी सोडून दिल्यास भाजप राहुल गांधींच्या माफीची मागणी करणार नसल्याची ऑफर सरकारकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंबंधी माहिती देणारा ट्विट केला आहे. संयुक्त संसदीय समितीची मागणी सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
23 मार्चपर्यंत संसदेचे कामकाज तहकूब
विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर राज्यसभा तसेच लोकसभेचे कामकाज मंगळवारी सलग 7 व्या दिवशी तहकूब करण्यात आले. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे बोलण्यासाठी उभे राहताच सत्तारुढ खासदारांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी 23 मार्चपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित केले. तत्पूर्वी धनखड यांनी कामकाज सुनिश्चित करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. यात भाजप, वायएसआर काँग्रेस आणि तेदेप वगळता अन्य राजकीय पक्षांचे नेते सामील झाले नाहीत. तर लोकसभेचे कामकाजही विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे स्थगित करावे लागले आहे.









