राज्यपालांच्या अभिभाषणाने प्रारंभ, सहा दिवस चालणार : पंतप्रधान मोदी यांच्या सभेमुळे 6 रोजी कामकाज स्थगित
पणजी : नवीन वर्ष 2024 मधील पहिले विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवार दि. 2 फेब्रुवारीपासून सुरू होत असून ते शनिवार दि. 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व बेतुल येथे कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशीचे विधानसभा कामकाज स्थगित करण्यात आले असून ते शनिवार दि. 10 रोजी होणार आहे. गुऊवार दि. 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थमंत्री या नात्याने गोव्याचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपाल पी.एस.श्रीधरन् पिल्लई यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा शुभारंभ आज होणार आहे.
आज शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. ते एकूण 6 दिवस चालणार असून प्रश्नोत्तर तास, शून्य तास विधेयके-ठराव असे विविध प्रकारचे कामकाज अधिवेशनात समाविष्ट आहे. विरोधी पक्षीय आमदारांनी सत्ताधारी पक्ष-राज्य सरकारला धारेवर धरण्याचे-कोंडीत पकडण्याचे ठरविले असून त्यांची कसोटी लागणार आहे. मुख्यमंत्री व सरकार विरोधी पक्षांना कसे हाताळते ते देखील अधिवेशनात महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्न-समस्या मांडण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले असून राज्य सरकारला, सत्ताधारी पक्षाला घेरून जाब विचारला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
अधिवेशनासाठी एकूण 1367 प्रश्न आले असून त्यात 316 तारांकीत तर 1051 अतारांकीत प्रश्नांचा समावेश आहे. राज्यपालांनी मान्यता दिलेली विधेयके विधानसभा अधिवेशनात मांडली जाणार आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे. दि. 6 फेब्रुवारीचे कामकाज स्थगित कऊन ते दि. 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचा ठराव अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीचा अहवाल अधिवेशनात ठेवला जाणार आहे. एकूण 5 खासगी ठराव आले असून ते शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी चर्चेला येतील. त्याशिवाय अभिनंदन-शोक प्रस्ताव, सरकारी-खासगी विधेयकावरही चर्चा होणार आहे.