अर्थसंकल्पाची तारीख निश्चित नाही
पणजी : राज्याचा 2023-24 चा अर्थसंकल्प 27 मार्चपासून सुऊ होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असून त्यावरील चर्चा मात्र पुढील पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. अर्थसंकल्प मांडल्यानंतर याच अधिवेशनात तीन दिवस त्यावर चर्चा करण्याचे ठरले होते, परंतु कामकाज सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत विरोधी आमदारांनी आता चर्चा नको, ती पावसाळी अधिवेशनात ठेवा, अशी सूचना केली आणि ती सर्वानुमते मान्य झाली. आताच्या अधिवेशनात चर्चा केल्यास त्यातच वेळ वाया जाईल आणि प्रमुख महत्त्वाचे ज्वलंत विषय मांडण्यास वेळ मिळणार नाही असे कारण विरोधकांनी दिल्यामुळे त्यांची मागणी मान्य करण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. येत्या सोमवारी म्हणजे 27 मार्चपासून चार दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून ते 31 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यात 30 मार्च रोजी रामनवमीची सुट्टी अधिवेशनाला देण्यात आल्यामुळे एकंदरीत अधिवेशन चार दिवसांचेच होणार आहे. रामनवमीची सुट्टी सार्वजनिक नसून मर्यादित स्वऊपाची म्हणजे आरएच आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले. इतर कोणतेही कामकाज नसल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस वाढविण्यात काही अर्थ नाही, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.









