तीन वर्षांनंतर प्रथमच 18 दिवस चालणार : अर्थसंकल्प, दुरुस्ती विधेयके येणार चर्चेस
पणजी : राज्य विधानसभेचे वर्षाकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. 18 जुलैपासून सुरू होणार असून ते साधारणत: 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वात मोठे अधिवेशन आहे. त्याचे कामकाज 18 दिवस चालण्याची शक्यता आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होईल, तसेच विविध प्रकारची कायदा दुरुस्ती विधेयकेही चर्चेस येणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, राज्य विधानसभेचे अधिवेशन 18 दिवस करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरविले आहे. दि. 17 जुलै रोजी सोमवार असून देखील त्या दिवशी अधिवेशन सुरू होणार नाही, कारण त्या सोमवारी अमावस्या आहे. त्यामुळे त्याऐवजी दि. 18 जुलै रोजी अधिवेशनाला प्रारंभ होईल.
अधिक श्रावणाच्या पहिल्या दिवशी प्रारंभ
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज श्रीरामनवमी दिवशी होणार होते. मागाहून गोंधळ झाल्यामुळे सरकारने श्रीरामनवमी दिवशी अधिवेशनाचे कामकाज बंद ठेवले होते. यावेळी आषाढ अमावस्या सोमवार दि. 17 जुलै रोजी आहे. त्यामुळे अधिवेशनाला त्या दिवशी प्रारंभ न करता अधिक श्रावणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 जुलै रोजी होणार आहे.
तीन वर्षांतील जादा दिवसांचे अधिवेशन
अधिवेशनाचा कालावधी यावेळी जास्त दिवसांचा ठेवला आहे. तीन आठवड्यांतील 18 दिवस कामकाज होईल. दि. 11 ऑगस्ट रोजी शुक्रवार आहे. खासगी कामकाजासाठी हा आणखी एक दिवस मिळणार होता, मात्र त्याच्या पूर्वदिनी म्हणजेच गुऊवार दि. 10 ऑगस्ट रोजीच अधिवेशनाचे कामकाज संपुष्टात आणण्याचा इरादा आहे. कोविडमुळे आतापर्यंत गेल्या तीन वर्षांत विधानसभेचे व्यवस्थित असे पूर्ण दिवसांचे अधिवेशन होऊ शकले नव्हते, मात्र आता तब्बल 18 दिवस कामकाजाचे राहतील.
अर्थसंकल्पावर सविस्तरपणे चर्चा
या अधिवेशनात अर्थसंकल्पावर आमदारांना सविस्तरपणे चर्चा करता येईल आणि विरोधकांना देखील सविस्तरपणे विषय मांडता येतील. या अधिवेशनात सरकारतर्फे अनेक दुऊस्ती विधेयके मांडली जाणार आहेत. तथापि, प्रत्येक विधेयकावर सविस्तरपणे चर्चा करण्यास मात्र विरोधकांना वेळ मिळेल याची श्वाश्वती नाही, कारण अधिवेशनाच्या अखेरच्या काळातच शेवटच्या दोन दिवसांमध्ये ही दुरुस्ती विधेयके मांडली जातील आणि ती घाई गडबडीतच संमत केली जातील.









