वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक वर्षीच्या परंपरेनुसार वित्तविभागात ‘हलवा’ समारंभ साजरा करुन आगामी अर्थसंकल्पाचा श्रीगणेशा केला आहे. या समारंभाला अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व केंद्रीय अधिकारीवर्ग उपस्थित होता. केंद्रीय अर्थसंकल्पाची सज्जता अंतिम टप्प्यात आली की, हा समारंभ साजरा केला जातो. या समारंभानंतर अर्थसंकल्पात कोणतेही परिवर्तन केले जात नाही.
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. त्याची सज्जता आता झाली आहे. शुक्रवारी नॉर्थ ब्लॉक येथे हा समारंभ झाला. त्याला निर्मला सीतारामन यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरीही उपस्थित होते. नॉर्थ ब्लॉकच्या कक्षात हलव्याची पाकक्रिया करण्यात आली आणि निर्मला सीतारामन यांच्या हस्ते तो सर्व उपस्थितांना वाटण्यात येऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. वित्तविभागाचे कर्मचारीही या समारंभात सहभागी झाले.
अथसंकल्प सज्ज
अर्थसंकल्पाची गुप्तता सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी अर्थसंकल्पाच्या सज्जतेच्या अंतिम टप्प्यात एका कक्षात राहून काम करतात. यावेळी त्यांच्या कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशीही संपर्क होऊ दिला जात नाही. अर्थसंकल्प सज्ज झाल्यानंतर त्यासाठी काम केलेल्या सर्वांना हलव्याचा अल्पोपाहार देऊन त्यांचे तेंड गोड केले जाते. ही प्रथा प्रथम अर्थसंकल्पातासून आजवर पाळण्यात आलेली आहे. याहीवेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रथेचे पालन केले असून आता केंद्रीय अर्थसंकल्प सज्ज झाला आहे, हा संकेत या कार्यक्रमातून मिळाला आहे. आता हा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार आहे.









