राजकुमार टोपण्णावर यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
बुडामधील भूखंड वाटपात झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी दोन दिवसांत अहवाल द्यावा, अशी मागणी आम आमदी पक्षाचे उत्तर कर्नाटक प्रमुख राजकुमार टोपण्णावर यांनी केली आहे. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली असून 17 डिसेंबर रोजी पुराव्यांसह लोकायुक्त, शहर पोलीस आयुक्त व नगरविकास खात्याकडे या भ्रष्टाचारासंबंधी आपण तक्रार दिली आहे. आजतागायत संबंधितांची चौकशी झाली नाही. लोकायुक्त अधिकाऱ्यांनीही प्राथमिक चौकशी करुन अहवाल दिला नाही. बुडाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. चार महिने मुदत मिळाली तर बनावट कागदपत्रे तयार करून प्रकरण दडपण्यास त्यांना मदत होणार नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दोन दिवसांत अहवाल न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
नगरविकास खात्याने 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे. यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. बुडाचे अधिकारी माहिती देत नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक अधिकारी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कमी किंमतीत शेतकऱ्यांची जमीन घेऊन सर्वसामान्य नागरिकांना भूखंड देण्याऐवजी सरकारचे नुकसान होईल, अशा पद्धतीने होळीच्या दिवशी 101 भूखंडांचा लीलाव झाला आहे. दोन दिवसांत अहवाल दिला नाही तर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे, रविंद्र बेल्लद, एम. के. सय्यद आदी उपस्थित होते.









