@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजकारणाच्या स्पर्धेत सध्या मागे पडलेला बहुजन समाज पक्ष नवी उभारी घेण्याची तयारी करीत आहे. सत्ता प्राप्त करण्यासाठी पक्षाचा चेहरामोहरा बदलण्याची योजना तयार करण्यात आली असून ती लवकरच घोषित केली जाणार आहे. आगामी सर्व निवडणुका गांभीर्याने लढून समर्थ राष्ट्रीय आणि स्थानिक पर्याय निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार, असे स्पष्ट करण्यात आले.
उत्तर प्रदेशात एकेकाळी पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केलेला हा पक्ष सध्या त्याच राज्यात दैन्यावस्थेत आहे. या पक्षाचा अवघा एक आमदार विधानसभेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱयांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत नवी योजना मांडली जाणार आहे.
आपला गमावलेला मतदार पुन्हा परत मिळविण्यासाठी पक्षाने जोरदार प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना आणि पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा एकत्र केले जाणार आहे. पक्षाचा चेहरा मोहरा बदलून, पक्षाची पारंपरिक मतपेढी कायम राखतानाच नवे समाजघटक जोडण्याला या नव्या योजनेत भर देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.









