वृत्तसंस्था/ लखनौ
बसप सर्वेसर्वा मायावती यांनी 2023 मध्ये स्वत:चा भाचा आकाश आनंदला उत्तराधिकारी घोषित केले होते. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान आकाश आनंदला अपरिपक्व ठरवत त्यांनी त्याला पदावरून हटविले होते. त्यानंतर 47 दिवसांनी जून 2024 मध्ये मायावतींनी बसपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पुन्हा एकदा आकाश आनंदवर विश्वास व्यक्त केला होता. तेव्हापासून आकाश हाच त्यांचा उत्तराधिकारी असेल असे मानले जात होते, परंतु मायावती यांनी पुन्हा एकदा आकाश आनंदवरून आश्वस्त नसल्याचे दाखवून दिले आहे.
माझा खरा उत्तराधिकारी कोण होणार अशी पोस्ट करत मायावती यांनी बसपमध्ये स्वार्थ, नाती महत्त्वहीन असून बहुजनाचे हित सर्वोपरि असल्याचे नमूद केले आहे. बसपमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या चळवळीला सत्तेपर्यंत पोहोचविण्याकरता काशीराम यांच्याकडून सर्वकाही त्यागून स्थापन करण्यात आलेल्या पक्षात बहुजन हित सर्वोपरि असल्याचे मायावती यांनी म्हटले.









