डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी । प्रतिनिधी
डेगवेतील बीएसएनएल मोबाईल टॉवरद्वारे येत्या दोन दिवसात ४ जी सेवा सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व सामग्री एक आठवड्यापासून गावात आणून ठेवली गेली होती. आज रोजी पर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. सर्व शासकीय सेवा ग्रामपंचायत, तलाठी तसेच डेगवे सोसायटी आणि शाळा तसेच व्यावसायिक यांना २जी/३जी सेवेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. डेगवे ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलन तसेच उपोषण देखील केले गेले होते. जलद इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने सर्व स्तरातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या वतीने सर्व मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना जानेवारी अखेरपर्यंत मोबाईल इंटरनेट, एस. एम . एस तसेच फोन करण्यासाठी स्वतंत्र रिचार्ज प्लान जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एक वर्ष कालावधीचे सिमकार्ड वैधता अत्यावश्यक करण्यात आली आहे. यामुळेही ग्रामीण भागातील शेतकरी, असंघटित क्षेत्रातील मजूर, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यावसायिक यांना ४जी सेवा उपलब्ध झाल्यानंतर अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.
शिवसेना शिंदे गट उपविभाग प्रमुख आणि डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी ग्रामस्थांना पूर्णवेळ हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला होता. बीएसएनएल ही एकमेव मोबाईल सेवा किफायतशीर दरात गावात बहुतांश भागात उपलब्ध होत असल्याने ४जी सेवा उपलब्ध होणे ही गरज होती. आता गावच्या विकासासाठी अनेक मार्ग उपलब्ध होतील असे प्रतिपादन विजय देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.









