खासदार जगदीश शेट्टर यांचे सल्लागार समिती बैठकीत मार्गदर्शन
बेळगाव : बीएसएनएल ही दूरसंचार विभागातील मोठी कंपनी आहे. गावागावात बीएसएनएलचे नेटवर्क आहे. परंतु, आता स्पर्धेचे युग असल्याने खासगी कंपन्यांप्रमाणेच बीएसएनएलने आपल्या सेवा रुंदावणे आवश्यक आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करून गावागावात टॉवर उभे करून बीएसएनएलने आपली सेवा सुधारावी, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली. बेळगाव बीएसएनएल विभागाच्यावतीने आयोजित सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी कर्मचारी तसेच सदस्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक विकास जयकर यासह इतर उपस्थित होते.
खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या, तरुणपिढीला आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने नवीन टॅरिफ प्लॅन बाजारात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर इराण्णा कडाडी यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. बेळगाव जिल्ह्यामध्ये मागील आर्थिक वर्षात 43 कोटी रुपयांचा बीएसएनएलला नफा झाला आहे. यापैकी 23 कोटी रुपये नफा हा मोबाईल ग्राहकांकडून आला आहे. भविष्यात अजून उत्तम सेवा देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विकास जयकर यांनी सांगितले. यावेळी सीईओ एम. एस. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.









