चौघे अधिकारी निलंबित : रेल्वेतील सीट जीर्ण, शौचालयांची दुरवस्था अन् झुरळांचा वावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीएसएफ जवानांना खराब ट्रेन दिल्याप्रकरणी 4 रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात, रेल्वेने प्राथमिक चौकशीनंतर निष्काळजीपणाबद्दल या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. बीएसएफने रेल्वेवर ‘खराब, अस्वच्छ आणि जीर्ण’ डबे असलेली ट्रेन पाठवल्याचा आणि सैनिकांना गंतव्यस्थानी पोहोचवण्याला 72 तास उशीर केल्याचा आरोप केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बीएसएफने आगरतळा स्टेशन मॅनेजरकडे औपचारिक तक्रार देखील पाठवली. त्यात ईशान्य सीमा रेल्वेकडून (एनएफआर) विशेष ट्रेन उपलब्ध करून देण्यात ‘अक्षम्य विलंब’ झाल्याचा उल्लेख केला होता.
‘अमरनाथ यात्रा 2025’च्या दरम्यान कर्तव्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) सुमारे 1,200 सैनिक गुवाहाटीहून काश्मीरला जाणार होते. यासाठी रेल्वेकडून विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली होती. बीएसएफने दोन एसी-2 कोच, दोन एसी-3 कोच, 16 स्लीपर कोच आणि 4 जीएस/एसएलआर (जनरल स्लीपर/एसएसएलआर) कोचची मागणी केली होती. तथापि, त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विशेष ट्रेनची स्थिती खूपच वाईट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या खिडक्या तुटल्याचे दिसून आले. दरवाजे जाम झाले होते. शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य होते. सीट्स फाटलेल्या आणि तुटलेल्या स्थितीत होत्या. अनेक डब्यांमध्ये वीज कनेक्शन नव्हते. तसेच ट्रेनमध्ये झुरळेही फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या अस्वच्छतेबाबत रेल्वे विभागाकडे रितसर तक्रार केल्यानंतर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारीनंतर ट्रेन बदलली
सुरुवातीला बीएसएफ जवानांनी अशा जीर्ण झालेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार दिला. बीएसएफने ही बाब रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. बीएसएफच्या तक्रारीनंतर रेल्वेने तात्काळ कारवाई करत ट्रेन बदलली. बदली ट्रेन दिल्यानंतर बीएसएफचे जवान त्रिपुरातील उदयपूर येथून नवीन ट्रेनने अमरनाथ यात्रेचे रक्षण करण्यासाठी रवाना झाले आहेत.









