कराडजवळ अपघात; एक जण गंभीर
प्रतिनिधी/ कराड
कराडलगत नांदलापूर फाटा येथे कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात बीएसएफ दलात सेवा बजावत असलेल्या आणि चार दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. नितीन मोहन शेवाळे (वय 32, रा. शेवाळेवाडी, उंडाळे) असे अपघातात ठार झालेल्या जवानाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेवाळेवाडी-उंडाळे येथील नितीन शेवाळे हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. ते गंगानगर- राजस्थान येथे कर्तव्य बजावत होते. ते विवाहित असून गेल्या 4 दिवसांपूर्वी शेवाळेवाडी येथे गावी सुट्टीला आले होते. बुधवारी ते कामानिमित्त प्रथमेश शेवाळे याच्यासमवेत दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, नांदलापूर गावच्या हद्दीत बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चारचाकी कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नितीन शेवाळे आणि प्रथमेश शेवाळे (रा. शेवाळेवाडी, ता. कराड) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. दुचाकीवरील गंभीर जखमींना महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी, पोलिसांनी खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रूग्णालयात दाखल केल्यानंतर नितीन शेवाळे यांचा मृत्यू झाला. एक महिना सुट्टीवर आलेल्या जवान नितीनच्या मृत्यूने उंडाळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अपघात विभागाचे खलील इनामदार, धीरज चतुर यांनी धाव घेत जखमींना मदत केली.








