के. रत्नाकर शेट्टी आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्टस क्लब आयोजित के. रत्नाकर शेट्टी स्मृती 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत के. आर. शेट्टी लायाज संघाने बीडीके व नाईक क्रिकेट अकादमीचा, बेळगाव स्पोर्टस क्लबमध्ये स्पोर्टस अकादमी गदगचा, बीडीकेने एसएनएसी सावंतवाडीचा पराभव करून विजयी सलामी दिली. जोया काझी, आशुतोष हिरेमठ, शुभम खोत, गणेश माडीमानी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावरती आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी पुरस्कृर्ते प्रणय शेट्टी, धारवाड विभागीय संघटनेचे माजी समन्वयक अविनाश पोतदार, अजित कुलकर्णी, चेतन बैलूर, दयानंद हिरेमठ, अब्दुल सय्यद, प्रशांत लायंदर, डॉ. स्वप्नील पुजारी, बेळगाव स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष दिपक पवार, प्रकाश मिर्जी, बाळकृष्ण पाटील, समीरकेश कामत, संगम पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते यष्टीचे पुजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात बीडीके हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 117 धावा केल्या. त्यात सौरभ घाडीने 35, महेंद्र हबीबने 23 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे रिया शेट्टी व जोया काझी यानी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी लायाज संघाने 24 षटकात 5 गडीबाद 118 धावा करून सामना गड्यांनी जिंकला. तर शुभम खोतन 45 तर साईराज चव्हाण 19 धावा केल्या. बीडीकेतर्फे यशवंत उसमण्णावरने 2 गडीबाद केल्या. दुसऱ्या सामन्यात बीडीके स्पोर्टस फौंडेशने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 2 गडीबाद 161 धावा केल्या. त्यात गणेश माडीमनीने 73, सौरभ गुडीने 44 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे आदित्य वालकरने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडीचा डाव 24 षटकात सर्व गडीबाद 109 धावात आटोपला. त्यात रूद्र कामतने 65 तर दुर्वेशने 15 धावा केल्या. बीडीकेतर्फे पृथ्वी कांबळेने 4, महेंद्र हबीबने 2 गडीबाद केल्या.
तिसऱ्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाजने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडीबाद 166 धावा केल्या. त्यात जोया काझीने 47, शुभम खोतने 37 तर वेदांत पाटील व आनंद जाधव यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे सादशेखने 2, आदीत्यने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नाईक क्रिकेट अकादमी सावंतवाडीचा डाव 23.2 षटकात 98 धावात आटोपला. त्यात रूद्र कामतने 32, ओंमकार वाळकेने 26, चैतन्यने 11 धावा केल्या. के. आर. शेट्टी लायाजतर्फे शुभम पाटील, वेदांत पाटील, आर्या यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केल्या. चौथ्या सामन्यात बेळगाव स्पोर्टस क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 2 गडीबाद 240 धावा केल्या. त्यात आशुतोष हिरेमठने नाबाद 108 धावा करून शतक झळकविले. त्याला संचित सुतारने 76, निल पवारने 27, तर अणर्व कुंदपने नाबाद 15 धावा केल्या. स्पोर्टस अकादमी गदगतर्फे जहिद बेल्लारीने 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्टस अकादमी गदग संघाचा डाव 121 धावात आटोपला. तर झुरीयन खतापुरने 51, जहीद बल्लारीने 30, जहीद अत्तारने 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस क्लबतर्फे ऋतुराज सिंगने 2 तर सोहम पाटील, सोनम पाटील, तिनष्का जैन, साहिल पी. यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.









