प्रतिनिधी/ देवरुख
देवरूख क्रांतीनगर येथे सोन्याच्या दागिन्यांसाठी 80 वर्षीय वृध्द महिलेचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. खून केल्यानंतर या महिलेचा मृतदेह बिल्डींगच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी, देवरूखचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी दिवसभर घटनास्थळी होते. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शारदा दत्तात्रय संसारे असे निर्घृण खून करण्यात आलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. या बाबत दीपक दत्तात्रय संसारे याने फिर्याद दिली. देवरूख क्रांतीनगर येथील बिल्डिंगमध्ये दीपक संसारे आपली आई शारदा यांच्यासह वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी 9.30 वाजता दीपक आईला सांगून कामानिमित्त बाहेर पडला. दुपारी 1 वाजता पुन्हा घरी आला असता खोलीच्या दरवाजाला कुलुप लावलेले दिसले. दीपकने आईचा शोध घेतला असता ती न आढळल्याने दुपारी 2 च्या सुमारास त्याने सहकाऱयाच्या साथीने दरवाजाचे कुलुप तोडले.
दीपकने जेवण करून पुन्हा आईंचा शोध सुरू केला. दरम्यान रात्री 8 च्या सुमारास दीपक हातपाय धुण्यासाठी नळानजीक गेला. यावेळी नळाला लाल रंगाचे पाणी आले. यामुळे दीपकने सहकाऱयाच्या साथीने टेरेसवरील टाकीची पाहणी केली. यावेळी टाकीमध्ये साडी तरंगताना दिसली. पाहणी केली असता आईचा मृतदेह दृष्टीस पडला. या बाबतची खबर दीपकने तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी पंचनामा केला. रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भेट देत पाहणी केली.
शारदा संसारे यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढला असता त्यांच्या गळय़ातील माळ, पाटल्या, कुडी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या डोक्यावर घाव घातल्याने जखम झाल्याचे दिसले. सोन्याचे दागिने चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी श्वानपथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. हे श्वान इमारतीच्या परिसरातच घुटमळले. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे डोमणे, भागणे, कांबळे, चाळके उपस्थित होते. देवरूख ग्रामीण रूग्णालयात शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या खळबळजनक घटनेप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम 302, 201, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. भरदिवसा शारदा संसारे यांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पर्दाफाश करण्याचे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान आहे.









