खून करून पती कर्नाटकात पसार : आठच दिवसापूर्वी पत्नी आली होती माहेरी : विश्रामबाग पोलिसांकडून तपास सुरू
सांगली प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केला आहे. ही घटना वानलेसवाडी येथील शाळेजवळ झाली. खून करणारा पती गुरूवारी रात्री सासरवाडीच्या घरात घुसला आणि त्यांने पत्नीवर सपासप चाकूने हल्ला केला यात तिचा निर्घृण खून झाला. खून झालेल्या पत्नीचे नाव शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय 25 रा. कक्केरी) असे आहे. या प्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा उर्फ लक्ष्मीबाई शिवऊद्र दोमणी (वय 45 रा. मूळ तळवारगीर कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून पोलिसांनी खून करणारा संशयित सदाप्पा नागाप्पा कटीमणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत शिल्पा कटीमणी यांचा विवाह कर्नाटकातील कक्केरी गावात राहणाऱ्या सदाप्पा कटीमणी याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर संशयित सदाप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच दारूच्या नशेत तिला मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शिल्पा या आठवड्यापूर्वी माहेरी सांगलीतील वानलेसवाडी येथे आईकडे आल्या होत्या. 26 ऑक्टोबर रोजी शिल्पा यांना घेऊन जाण्यासाठी सदाप्पा त्यांच्या घरी आला. यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. यातून त्याने शिल्पा कटीमणी यांना पुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन दमदाटी आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने शिल्पा यांच्या शरीरावर सात ते आठ वार केले, पोटात चाकूचा वर्मी घाव बसल्याने त्या कोसळल्या.शिल्पा यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने पळ काढला. चाकूचा वर्मी घाव बसल्याने शिल्पाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कुटुंबियांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शिल्पा यांचा मृतदेह शववच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवला.यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, संशयित सदाप्पा कटीमणी हा पसार झाला असून पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी मूळगावी कर्नाटककडे रवाना झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार हे करत आहेत.